Maharashtra Weekend Lockdown | सिंधुदुर्गात सर्व आस्थापना बंद, सर्वत्र शुकशुकाट
Maharashtra Corona Weekend Lockdown : राज्यात वीकेण्ड लॉकडाऊन सुरु झाला असून यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील परंतु कोणालाही कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही.

Background
Maharashtra Weekend Lockdown : कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शुक्रवार (9 एप्रिल) रात्री 8 ते सोमवार (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद? त्यावर नजर टाकूया.
काय सुरु, काय बंद?
- डी मार्ट, बिग बाजार, रिलायन्स मॉल किंवा सुपरमार्केट सुरु राहणार का?
एकाच ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतरही वस्तू विकल्या जात असतील तर अशी दुकाने, मॉल्स, सुपरमार्केट बंद राहतील. - लॉकडाऊनच्या काळात काय सुरु, काय बंद?
अत्यावश्यक सेवा सर्व सुरु राहतील. मात्र, कोणालाही कारणाशिवाय प्रवास करता येणार नाही. - विकेंड लॉकडाऊन दरम्यान बाजार समित्या सुरु राहणार का?
हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतात. बाजारात जास्त गर्दी होत असल्याचे दिसल्यास ते बंद करु शकतील. - बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारे दुकाने चालू राहणार का?
नाही - गॅरेज, ट्रान्सपोर्ट सेवा, अटोमोबाईल स्पेअर पार्ट विकणारी शॉप्स सुरु राहणार का?
वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. - केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात का?
नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील. - दारु विक्रीची दुकाने उघडी राहणार का?
नाही. - रस्त्याच्याकडेचे ढाबे उघडे राहणार का?
हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात. - इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?
नाही. - दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील?
नाही. - आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?
हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी 7ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात - आठवड्याच्या शेवटी रात्री 8 नंतर किंवा सकाळी 7 च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करु शकतात का?
आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (वीकेण्ड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाहीत. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.
सिंधुदुर्गात सर्व आस्थापना बंद, सर्वत्र शुकशुकाट
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने दोन दिवसाचा वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या वीकेण्ड लॉकडाऊनची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व आस्थापना बंद ठेऊन नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चौकचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच कामाशिवाय घराबाहेर निघालेल्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्या प्रशासन आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासियांना घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वीकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमींची हजेरी
मुंबईत लॉकडाऊनमुळे दारुच्या विक्रीला बंदी आहे. मात्र तरीही तळीराम वाईन शॉपबाहेर रांगा लावत आहेत. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर असल्फा इथल्या साईनाथ वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमी दारु घेण्यासाठी हजेरी लावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी शटर बंद असले तरी इतर मार्गाने दारु मिळत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी विभागातून मद्यप्रेमी जमा होत आहेत. मात्र वाईन शॉप मालकाने गर्दी होत असल्याने दुकान बंद केलं. तर आम्ही इथेच राहतो, घरं लहान आहेत म्हणून इथे आलो आहे, अशी विचित्र कारणं तळीराम सांगत आहेत.























