(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात आज 4205 कोरोना रूग्णांची नोंद, तीन बाधितांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्य पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आज बैठक घेतली.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 4205 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज रूग्णसंखेत घट झाली आहे. काल राज्यात 5218 रूग्णांची नोंद झाली होती.
महाराष्ट्रात आज 3752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 77,81,232 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.82 टक्के एवढे झाले आहे.
तीन बाधितांचा मृ्त्यू
राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा आहे.
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो भाविक भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली असून दोन महिन्यांपूर्वीच्या केवळ 626 सक्रिय रुग्णांवरून ही संख्या 25 हजारा पर्यंत पोहचली आहे.
राज्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्य पाहता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आज बैठक घेतली. सध्या राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जास्त सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण
भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे. ही 27 वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. 19 जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
देशातील रूग्णांमध्ये वाढ
गेल्या 24 तासांत देशात 17 हजार 336 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 100 दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. गुरुवारी दिवसभरात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 24 954 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी करत देशातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.