Coronavirus New XE Variant : देशातील XE व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत, घाबरण्याचं कारण नसल्याचा राजेश टोपेंचा निर्वाळा
Coronavirus New XE Variant : मुंबईतील सांताक्रूझचा रहिवाशी आहे. गुजरातमधील बडोदा येथे तो रुग्ण गेला होता. बडोदा येथे रिपोर्ट जिनोमिक सिक्वेन्स करण्यात आले. त्यात XE चा व्हेरियंट आढळून आला.
मुंबई : मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ई व्हेरियंट (XE) आढळला आहे. आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबईतील सांताक्रूझचा रहिवाशी आहे. गुजरातमधील बडोदा येथे तो रुग्ण गेला होता. बडोदा येथे रिपोर्ट जिनोमिक सिक्वेन्स करण्यात आले. त्यात XE चा व्हेरियंट आढळून आला. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. 1 आणि बी ए. 2 चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहितीवरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. एक्स ई व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान केंद्र सरकारने पाच राज्यांना पाठवलेल्या पत्रात महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्र सरकारने काळजी घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान भीतीचं कुठलेही कारण नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे देखील आरोग्य मंत्री या वेळी म्हणाले आहे.
XE व्हेरियंटची लक्षणं काय?
यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या मते, XE व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये नाक वाहणं, शिंका येणं आणि घशात खवखव होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात, जी विषाणूच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. कारण, मूळ स्ट्रेनमध्ये रुग्णाला ताप आणि खोकला यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो.