Exclusive : कोविड आवडे मास्क कंपन्यांना... मास्क बनवणाऱ्या कंपन्यांचा मोठा काळाबाजार उघड
कोरोना काळात सर्वात महत्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे मास्क. याच मास्क बनवणाऱ्या कंपन्यांकडून मोठा काळाबाजार केल्याचं समोर आलं आहे. या कंपन्यांनी पाच रुपये किंमतीचा मास्क 80 रुपयाला विकलाय तर 125 रुपयांचा मास्क 475 रूपयांना विकल्याचं समोर आलं आहे.
उस्मानाबाद : दुष्काळ आवडणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. दुष्काळात टॅंकर, चारा छावण्या, छावण्यातल्या जनावरांचे शेण विकून काही लोकांनी भ्रष्टाचार केला. तसाच महाभयंकर कोविड आवडणारे ही राज्यात आहेत. त्यांनी कोविडच्या साथीच्या भीतीचा पुरेपूर वापर केला आहे. कोरोना काळात सर्वात महत्वाचा घटक मानला जातो तो म्हणजे मास्क. याच मास्क बनवणाऱ्या कंपन्यांकडून मोठा काळाबाजार केल्याचं समोर आलं आहे. या कंपन्यांनी पाच रुपये किंमतीचा मास्क 80 रुपयाला विकलाय तर 125 रुपयांचा मास्क 475 रूपयांना विकल्याचं समोर आलं आहे.
राज्यभरातील मास्कचा काळाबाजार उघड झालाय. हा काळाबाजार नेमका कसा होतोय ते राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या समितीनेच उघड केले आहे. त्याची एक प्रत एबीपी माझाकडे आहे. या काळ्या बाजारामुळे एका कंपनीचा नफा थोडाथोडका नव्हे साडेतीन कोटी वरून थेट 125 कोटींवर गेलाय. दोनच कंपन्यांनी मिळून राज्य सरकार आणि जनतेला अवाच्या सव्वा दराने मास्क विकून 200 कोटी रुपये पाच महिन्यात कमावले आहेत.
सरकार आणि जनतेला अवाच्या सव्वा दरात मास्कची विक्री होते, याबद्दल सुरुवातीपासूनच चर्चा होती. त्याच्या सतत तक्रारी येऊ लागल्यानं राज्य सरकारने एक समिती गठित केली. या समितीमध्ये एकूण चार जणांचा समावेश होता. या समितीने रायगड जिल्ह्यातल्या दोन कंपन्यांना प्रातिनिधिक स्वरूपात भेटी दिल्या. राज्याच्या आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करत होती. समितीत हापकिन बायो फार्मास्युटिकल्स व्यवस्थापकीय संचालक सीमा व्यास, आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या संचालक डॉक्टर साधना तायडे आणि एफडीएचे सहआयुक्त मंत्री यांचा समावेश हेता.
समितीने वीनस आणि मॅग्नम या रायगड जिल्ह्यातल्या दोन कंपन्यांना भेटी दिल्या. कंपन्यांचे दप्तर तपासले. कंपन्यांना नेमकी उत्पादन खर्चाचे तपशील विचारले. या तपशीलांची बाजार किमतीशी ज्यावेळेला पडताळणी केली गेली. त्या वेळेला धक्कादायक आकडेवारी समोर आली. केवळ पाच रुपये, तीन रुपये, दहा रुपये एवढे उत्पादन किंमत असताना कंपन्यांनी 40 रुपयांपासून 475 रुपयापर्यंत मास्क विकले. अर्थातच त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात या दोन कंपन्यांना होतोय.
वीनस कंपनीचा 2016- 17 या आर्थिक वर्षात निव्वळ नफा तीन कोटी 71 लाख रुपये होता. परंतु कोविड नंतर कंपनीने ज्या प्रमाणात मास्क विकले, त्यामुळे यावर्षी या कंपनीचा नफा 125 कोटी रुपयांच्या घरात जाईल असा समितीचा अंदाज आहे. मॅग्नम कंपनीच्या 2016-17 पासून ते 2020 पर्यंतच्या आर्थिक ताळेबंदाचा समितीने अभ्यास केला. 2016-17 या वर्षी कंपनीला केवळ 25 लाख रुपये नफा झाला होता. परंतु यावर्षी कंपनीला तब्बल 88 कोटी रुपयांचा नफा होईल असा समितीचा अंदाज आहे.
महाराष्ट्रामध्ये मास्कचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण वानगीदाखल केवळ दोनच कंपन्यांची आकडेवारी समितीच्या समोर आली. त्यातूनच मास्कचा खरेदीचा काळाबाजार किती मोठा आहे याचा अंदाज आला आहे. मास्क उत्पादन कंपन्या क्षेत्रीय अभ्यास गट आणि शासनातील अधिकाऱ्यांसोबत समितीने अनेक वेळा चर्चा केली. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार उत्पादक कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली. परंतु वीनस कंपनीने माहिती देण्यास टाळाटाळ केली. वेळकाढूपणा केला असेही समितीने निरीक्षण नोंदवलं आहे. नफेखोरी आणि सामान्य नागरिकांच्या गरजांची पूर्तता यामध्ये संतुलन राखण्यासाठी समितीने या मास्कच्या किमती मध्ये बदल करावेत आणि किमती नियंत्रणात कराव्यात अशी शिफारस सरकारला केली आहे.