Maharashtra Corona Update : राज्यात आज 197 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, सक्रीय रूग्णांची संख्या हजारच्या पार
Corona News Update : मागील चार महिन्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1000 हून अधिक झाली आहे.
Corona News Update : राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात आज 197 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या 1 हजार 29 झाली आहे. चार महिन्यांनंतर सक्रीय रूग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. 13 नोव्हेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार पार झालीय.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मृत्यू झाल्याची नोंद नाही. सध्या राज्यात मुंबई, पुणे आणि ठाण्यात सक्रीय रूग्ण जास्त आहेत. कालच्या तुलनेत आज नव्या रूग्णांमध्ये घट झाली आहे. राज्यात काल 226 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत आठवड्यात 355 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली. परंतु 9 ते 15 मार्च दरम्यान 688 रूग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तेथे 279 प्रकरणे आढळून आली आहेत. तेलंगणामध्ये कोरोनाचा संसर्ग दर 0.31 टक्के, तामिळनाडूमध्ये 1.99 टक्के, केरळमध्ये 2.64 आणि कर्नाटकमध्ये 2.77 टक्के नोंदवला गेला आहे. त्यामुळे या राज्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत.
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय तर दुसरीकडे इन्फ्ल्यूएन्झा आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची देखील संख्या वाढत असल्यानं चिंतेचा विषय ठरत आहे.
एच3एन2 च्या रूग्णांमध्ये वाढ
कोरोनासोबतच राज्यात एच3एन2 च्या रूग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. एच3एन2 च्या 119 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत. एच3एन2 ची रुग्णसंख्या राज्यात 324 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत एच3एन2 मुळे तीन जणांचा मृत्यू झालाय. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून रूग्णांवर वेळेत उपाचर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.
घाबरु नका...!
मुख्यत्वे फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. अशा प्रकारचे विषम वातावरण हे विषाणू वाढीसाठी अधिक पोषक आहे. त्यामुळे आपल्याला सध्या विषाणूजन्य तापाची साथ दिसते आहे. हा नवीन विषाणू नाही. त्याच्या प्रसाराची पद्धत, लक्षणे ही इतर कोणत्याही विषाणू सारखीच आहेत. त्यामुळे या संदर्भात लोकांनी घाबरून जाण्याची काहीही गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या