(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 1997 कोरोना रुग्णांची नोंद तर बीए. 2.75 चे 32 रुग्ण
Maharashtra Corona Update : राज्यात आज सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 1997 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2470 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,82,236 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.99 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 13186 सक्रिय रुग्ण
राज्यात एकूण 14092 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 4405 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1797 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बीए. 5 चे चार रुग्ण आणि बीए. 2.75 चे 32 रुग्ण
राज्यात बी ए.5 चे चार रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए. 2.75 व्हेरीयंटचे देखील 32 रुग्ण आढळले आहेत. यातील 23 रुग्ण नागपूर येथील, 11 यवतमाळ , आणि दोन वाशिम येथील आहेत. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 196 तर बीए. 2.75 रुग्णांची संख्या 120 झाली आहे.
कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली
देशात कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली आहे, मात्र धोका कायम आहे. देशात गुरुवारी 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचिंत कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.