(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 17 जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,29,714 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 35 , 22, 546 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 347 रुग्णांची भर तर चार जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 347 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 363 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 3326 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,36,947 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2761 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11,466 दैनंदिन रुग्णांची नोंद
भारतात एका दिवसांत कोरोनाच्या 11 हजार 466 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून बुधवारी तीन कोटी 43 लाख 88 हजार 579 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 1 लाख 39 हजार 683 वर पोहोचली आहे. जी 264 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची एकूण परिस्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 4,61,849 वर पोहोचला आहे. देशात सलग 33 दिवसांपासून कोरोनाच्या 20 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर 136 दिवसांपासून 50 हजार सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.