Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11,466 दैनंदिन रुग्णांची नोंद; 460 मृत्यू
Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 466 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Today : भारतात एका दिवसांत कोरोनाच्या 11 हजार 466 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून बुधवारी तीन कोटी 43 लाख 88 हजार 579 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 1 लाख 39 हजार 683 वर पोहोचली आहे. जी 264 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची एकूण परिस्थिती...
आतापर्यंत 4,61,849 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 4,61,849 वर पोहोचला आहे. देशात सलग 33 दिवसांपासून कोरोनाच्या 20 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर 136 दिवसांपासून 50 हजार सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.
राज्यात आज 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.62 टक्क्यांवर
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 61 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे.
राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,33,262 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 867 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 33 , 99, 355 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठं यश आलंय. कोरोनाच्या महामारीच्या काळात मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरं जावा लागलं होतं. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळतंय. यातच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तिनशेहून कमी रुग्णांची नोंद झालीय. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचलाय. तर, आज केवळ एकाच व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमवलाय.