चांगली बातमी! राज्यात आज पुन्हा नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त
आज राज्यात 65,934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले तर 51,880 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनातून बरे होणाऱ्यांची सख्या नवीन बाधितांपेक्षा जास्त आहे.
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. आज राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे.
राज्यात आज 891 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ
टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
टेस्टिंग कमी केलेली नाही
राज्यात कोरोना टेस्टिंग कमी केलेली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. टेस्टिंग 2.50 लाखांपासून 2 लाख 80 हजारांपर्यंत कोरोना टेस्ट रोज केल्या जात आहेत. टेस्टिंगमध्ये RTPCR टेस्टची संख्या अधिक आहे. आपण 65 टक्के RTPCR टेस्ट करतो आहोत आणि अँटिजनची टक्केवारी 35 टक्के आहे. इतर काही राज्यांच्यामध्ये अँटिजन टेस्टची संख्या अधिक आहे.