दिलासादायक! राज्यात शुक्रवारी जवळपास 70 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, तर नवे 62 हजार बाधित
राज्यात शुक्रवारी जवळपास 70 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर नवे 62 हजार बाधित रुग्णांची नोंद झाली.
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना शुक्रवारी दिलासादायक बातमी आली आहे. शुक्रवारी तब्बल 69 हजार 710 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 84.06% एवढा झाला आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान आज 828 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.5% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,71,06,282 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 46,02,472 (17 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,93,686 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या स्थिरावली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे. रुग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.
आतापर्यंत 1 कोटी 58 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. 'कोरोना चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. 12 कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी आहे. मे महिन्यात 18 लाख डोस मिळणार आहे. परंतु, लशींचं उत्पादन मर्यादित स्वरुपात होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जून ते जुलैमध्ये लशींचा साठा सुरळीत होईल असेही ते म्हणाले.