लॉकडाऊननंतरही राज्यात रुग्णसंख्या कमी होईना; शनिवारी तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची भर
लॉकडाऊननंतरही राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. आज तब्बल 63 हजार 282 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. आज राज्यात तब्बल 63 हजार 282 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज 61 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता 84.24 % एवढे झाले आहे. तर राज्यात आज 802 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 (17.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण सुरु
राज्यात आज 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्या 2 मे सून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत. वयोगटासाठी आज सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. पुण्यात 19 केंद्रांवर 1316 जणांचं लसीकरण झालं. तर मुंबईतील पाच केंद्रांवर 1004 जणांचं लसीकरण झालं.