Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 2289 कोरोना रूग्णांची नोंद तर 2400 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 2289 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2400 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,64,831 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 14519 सक्रिय रुग्ण
राज्यात एकूण 14519 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 5125 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1937 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात नव्या रुग्णांची संख्या 20 हजारांपार
मागील दोन दिवस देशात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याची नोंद झाली होती. पण आज पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 40 कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने 40 रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 25 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 45 हजार 654 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला!
देशात आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे, तर 12 वर्षांखालील मुलांनाही लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली. ज्या अंतर्गत भारताने 200 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.