Maharashtra Corona Crisis : ... तर बाहेरील तालुका, जिल्ह्यातील रुग्ण बार्शीत अॅडमिट करु देणार नाही; ऑक्सीजन, रेमेडेसिवीर पुरवठ्यावरुन आमदार राजेंद्र राऊतांचा इशारा
Maharashtra Corona Crisis : बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर : बार्शी तालुक्याला जर ऑक्सिजन आणि रेमेडेसिवीर पुरवठा करण्यास मदत केली नाही तर इतर तालुका आणि जिल्ह्यातील रुग्ण बार्शीत अॅडमीट करु देणार नाही, असा धक्कादायक इशारा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला. बार्शीतील कोरोना स्थितीबाबात उपाययोजना करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. "बार्शीत 80 टक्याहून अधिक रुग्ण हे बाहेरील तालुके तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी तसेच बाहेरुन येणाऱ्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी ऑक्सिजन आणि रेमेडेसिवीर पुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे. वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून देखील दुर्लक्ष केलं जात आहे. जर दोन दिवसांत ऑक्सिजन आणि रेमेडेसिवीर पुरवठा करण्यास सहकार्य करण्यात आलं नाही तर नाईलाजाने सर्वपक्षीय नेते आणि रुग्णालय प्रशासन यांची बैठक घेऊन बाहेरील तालुक्यातील रुग्ण अॅडिमट करुन घेणार नाही असा निर्णय घेऊ." अशी धक्कादायक प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "बार्शी तालुका मेडिकल हब आहे. तालुक्यात मेडिकल यंत्रणा सक्षम असते. त्यामुळे मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, कळंब, तुळजापूर, मुरुम इत्यादी ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी बार्शीत येतात. माणुसकीच्या नात्याने त्यांना सहकार्य करण्याची भूमिका बार्शीने नेहमीच बजावली आहे. बार्शीत सध्या 1 हजार रुग्ण अॅडमिट आहे. त्यातील जवळपास 80 टक्के रुग्ण बाहेरील तालुके आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. केवळ 20 टक्के रुग्ण हे बार्शी तालुक्यातील आहे. बार्शीला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा होणारा पुरवठा हा तालुका म्हणून मिळतो. त्यामुळे बाहेरील तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील ऑक्सिजनचा साठा बार्शीला काही प्रमाणात वर्ग करावा. त्या तालुक्यातील लोकांनी देखील प्रशासनास हे करण्यासाठी भाग पाडावे. आम्ही वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून देखील दुर्लक्ष केलं जात आहे. जर दोन दिवसांत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा करण्यास सहकार्य करण्यात आलं नाही तर नाईलाजाने सर्वपक्षीय नेते आणि रुग्णालय प्रशासन यांची बैठक घेऊन बाहेरील तालुक्यातील रुग्ण अॅडिमट करुन घेणार नाही. असा गर्भित इशारा मी देतो." असं वक्तव्य आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे.
नागरिकांनी दहा दिवसाच्या कडक लॉकडाऊनचं पालन करावं : आमदार राजेंद्र राऊत
बार्शीत अत्यावश्यक सेवेवर देखील कठोर निर्बंध आणत जनतेने कडक लॉकडाऊनचं पालन करावं, असं आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे. "जीवनात पैसे परत मिळतील, उद्योग पुन्हा सुरु करता येतील. मात्र जीव हा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी बुधवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊनचं पालन करावं. यामध्ये जीवनावश्यक विषय यात न आणता केवळ दुध, मेडिकल आणि शेतकऱ्यांनी थेट घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्यास मुभा देण्यात येईल. मात्र भाजी मंडई तसेच लिलाव प्रक्रियाही बंद ठेवण्यात येईल. व्यापाऱ्यांनी यास सहकार्य करावे." असं आवाहन देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus | महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार, लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक करण्याचा निर्णय
- Corona Vaccination | लसीकरणाच्या बाबतीत 'एक देश, एक किंमत' का नाही? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल
- माध्यम स्वातंत्र्याबद्दल भारताची स्थिती 'वाईट'; World Press Freedom Index च्या अहवालात मोदी सरकारवर ताशेरे