राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु, विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकारक नाही : उदय सामंत
राज्यभरातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेतून दिली. 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरु होणार आहेत.

मुंबई : राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीनं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना संकट पाहता विद्यार्थ्यांना तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नसणार आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
उदय सामंत म्हणाले की, "महाविद्यालयं सुरु करत असताना एक महत्त्वाची भूमीका विद्यापिठांची किंवा खाजगी विद्यापिठांची असली पाहिजे. यूजीसीने म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांच्या वर्गांची संख्या, त्यामध्ये किती विद्यार्थी बसण्याची व्यवस्था आहे. त्या बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संख्येसह महाविद्यालयं सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजेच, 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालयं सुरु केली जातील." पुढे बोलताना ते म्हणाले की, "महाविद्यालयं सुरु करण्यासाठी युजीसीनंही काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संबंधित यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना पायाभूत सुविधांची माहिती दिली पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची पार्श्वभूमी पाहून हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालयं सुरु करण्यात यावी. ही विद्यापीठं महाविद्यालयं 15 फेब्रवारीपासून सुरू करू शकतात"
पाहा व्हिडीओ : राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु : उदय सामंत
"महाविद्यालयं सुरु होत असताना वसतीगृहांचा जो प्रश्न आहे. तो टप्प्याटप्प्यानं सुरु करण्याचे अधिकार विद्यापिठांकडे देण्यात आले आहेत. पण सध्या 15 फेब्रुवारी रोजी सुरु होताना फक्त कॉलेज सुरु होतील." असं उदय सामंत यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात, अशी चर्चा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत झाली. त्यामुळे हा निर्णयही विद्यापीठानं घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय खुले ठेवावेत, अशी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे."
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून राज्यातील शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले होते. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अशातच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
