रेणू शर्मा यांच्या बहिणीकडूनही धनंजय मुंडेंविरोधात तक्रार; उत्तर देत मुंडे म्हणतात...
करुणा यांच्या फेसबुक पोस्टबाबत माहिती मिळतात पुन्हा या प्रकरणाला हवा मिळाली आणि चर्चा सुरु झाल्या. ज्यावर अखेर खुद्द धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील काही गंभीर आरोप मागे घेतल्यानंतर आता कुठे त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत होत्या. किंबहुना बीड आणि औरंगाबादमध्ये गेलं असता मुंडे यांचा जंगी सत्कारही करण्यात आला. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्यापुढील अडचणी वाढच्याचं पाहायला मिळत आहे.
आता खुद्द करुणा शर्मा यांनीच त्यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. करुणा यांच्याआधी त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या नावे तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर त्यांनी ही तक्रार मागेही घेतल्याचं पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. आता त्याच करुणा शर्मा यांनी मुंडेंविरोधात आवाज उठवत त्यांनी मागील तीन महिन्यांपासून आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामध्ये 14 वर्षांच्या मुलीचा समावेश असल्याचं म्हणत तिला धोका असल्याचंही या तक्रारीत म्हटलं गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सदर घटनेमध्ये पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा करत असं न झाल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशाराही करुणा यांनी दिला. फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या पतीनं मुलांना तीन महिन्यांपासून डांबलं असून त्यांना भेटूही दिलं जात नसल्याचा खुलासा केला आहे. राजकीय बळाचा हा दुरूपयोग आहे, अशा शब्दांत त्यांनं मुंडेंबाबतचा हा गौप्यस्फोट केला आहे.
करुणा यांच्या फेसबुक पोस्टबाबत माहिती मिळतात पुन्हा या प्रकरणाला हवा मिळाली आणि चर्चा सुरु झाल्या. ज्यावर अखेर खुद्द धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
'आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन, त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे.
सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना मना आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून मा. उच्च न्यायालयाने मा. मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशन च्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशन मध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत'.
मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारं असल्याचं म्हणत, 'मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे', ही बाब त्यांनी मांडली. शिवाय सदर प्रकरणी निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही हा मुद्दा अधोरेखित करत वस्तुस्थिती आणि न्यायालयीन प्रकरण, एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.