CoronaVirus | लॉकडाऊन पाहिजे की..., नियमांची पायमल्ली होत असल्यास कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक
मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा फोफावताना दिसत असल्यामुळं नाईलाजानं काही कठोर पावलं उचलली जाती असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर याबाबतचे निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. ज्यानंतर कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैकीनंतर काही महत्त्वाच्या सूचना लागू करत त्या अंमलात आणण्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचं स्पष्ट झालं.
Corona Alert | कोविड रुग्णसंख्या वाढती राहिल्यास मुंबईत लॉकडाऊन, महापौरांचे संकेत
तूर्तास राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही असंच सध्या कळत आहे. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असं म्हणत लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असं राज्यातील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रत्येक रुग्णाचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत
कोरोनाचा संसर्ग वाढत असेल अशा भागांमध्ये किंवा त्या परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले असून, प्रत्येक रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत असंही सांगण्यात आलं आहे.
कोरोना संपल्याचाच अविर्भाव
सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत. परिणामी आपल्याच घरातील वृद्ध आणि ज्येष्ठांना आपण धोक्यात आणतो आहोत ही बाब इथं अधोरेखित करण्यात आली. मधील काळात सुरु करण्यात आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम' राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करण्याचे निर्देशही राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.
गरज असणाऱ्या भागांना प्रतिबंधित करा
कोरोनाचा संसर्ग पाहचा जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे त्या दृष्टीनं पावलं उचलत प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करा असं सांगत न निभावल्या जाणाऱ्या एसओपीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
नियमांचं उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई
मागील काही दिवसांपासून थांबलेले आणि लांबलेले लग्न समारंभ पुन्हा सुरू झाले आहेत. लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या आणि इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसत आहेत. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र तिथं नियमांचं पालन होताना दिसत नाही, त्यामुळं स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे. शिवाय ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्कचा वापर आणि इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करत, गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा, शिवाय ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा. ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा अशा अनेक सूचना राज्यातील नागरिकांना करण्यात आल्या आहेत.