महाराष्ट्र तापला! नेमका का वाढतोय राज्यात तापमानाचा पारा?
Heat News : राज्यातील वातावरणात बदल (climate Changes) होत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे.
Maharashtra Weather Heat News : राज्यातील वातावरणात बदल (climate Changes) होत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान साधारणत: 35 अंशाच्या पुढे गेलं आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होतेय. दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) तापमानाचा पारा नेमका का वाढतोय? याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी एबीपी माझाला दिली आहे. खुळे नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
का वाढतेय उष्णता?
मार्च ते मे हा 3 महिन्याचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खुप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. याच दरम्यान पाकिस्तान अफगाणिस्तान आणि राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरुन वारे, उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात. त्यामुळं उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
पूर्व मोसमी (मार्च ते मे ) हंगामात जेव्हा दोन प्रति -चक्रीवादळे, अथवा प्रति-विवर्ते (अँटीसायक्लोन) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उप सागरात किंवा किनारपट्टीच्या भू भागावर तयार होतात. तेव्हा या दोघांच्या मध्ये वाऱ्याची विसंगती (विंड डिसकंटीनुईटी ) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बंगालच्या उपसागराच्या बाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ' वारा खंडितता (विंड डिसकंटीनुईटी ) म्हणतात.
हवेच्या कमी दाबाचा आस कर्नाटकपासून विदर्भापर्यंत
वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटी पासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत पसरला आहे. याची रुंदीही काही किलोमीटरमध्ये आहे. त्यामुळं तिथे वारा शांत असतो. हवेच्या दाबाच्या रेषाचे व वारा दिशांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळं या क्षेत्रात आर्द्रतायुक्त उष्ण हवा लोटली आहे. सौराष्ट्र व कच्छ, उत्तर कर्नाटकात तसेच नैरूक्त राजस्थानात उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवत आहे. म्हणून या पाच दिवसात महाराष्ट्रात अति नसली तरी उष्णता वाढलेली आहे.
महत्वाच्या बातम्या: