Bhima Koregaon Case : काय घडलं होतं त्या दिवशी? असा आहे भीमा कोरेगाव हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम
Koregaon Bhima : 1 जानेवारी 2018 साली या लढाईला 200 वर्षे पूर्ण होत होती .या निमित्ताने शासनाकडून कोरेगाव भीमा या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.
पुणे : एक जानेवारी 1918 साली इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये पुण्याजवळील कोरेगाव - भीमा (Bhima Koregan) या गावाजवळील भीमा नदीच्या काठावर लढाई झाली . या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव झाला आणि महाराष्ट्रात इंग्रजांचा अंमल सुरु झाला. इंग्रजांच्या सैन्यात सर्वच जाती - धर्माचे भारतीय सैनिक लढत होते. मात्र त्यामध्ये महार सैनिकांची संख्या मोठी होती. या लढाईचे महत्व इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन होण्यात किती आहे हे जाऊन इंग्रजांनी भीमा नदीच्या काठावर या लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या स्मुर्तीप्रित्यर्थय विजय स्तंभ उभारला. या स्थंभावर सर्वच जातीधर्मातील सैनिकांची नावे पाहायला मिळतात ज्यामध्ये महार सैनिकांचे प्रमाण मोठे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 ला या विजयस्तंभाला भेट दिली. महार समाजामध्ये या पराक्रमाच्या माध्यमातून जागृती व्हावी आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये महार रेजिमेंट नव्याने सुरु व्हावी या डॉक्टर आंबेडकरांचा या भेटीमागचा उद्देश होता . त्यानंतर आंबेडकरी समाजाकडून प्रत्येक वर्षी एक जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय दिन साजरा करण्यास सुरुवात झाली .
1 जानेवारी 2018 साली या लढाईला 200 वर्षे पूर्ण होत होती .या निमित्ताने शासनाकडून कोरेगाव भीमा या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन राज्य सरकारमधील अनेक मंत्रीही कोरेगाव भीमा या ठिकाणी भेट देणार होते. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला पुण्यातील शनिवार वाड्यावर पुरोगामी संघटनांकडून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आलं . न्यायमूर्ती बी. बी .सावंत , न्यामूर्ती कोळसे पाटील , प्रकाश आंबेडकर हे या परिषदेचे आयोजक होते . कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांसह देशभरातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते या एल्गार परिषदेला उपस्थित होते .
परंतु 1 जानेवारी 2018 च्या आधी काही दिवस कोरेगाव भीमा आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. कारण कोरेगाव भीमापासून काही किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेलं वढू हे गाव आहे. या वढू गावात संभाजी महाराजांच्या समाधीच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातील महार समाजातील सरदार गोविंद गोपाळ यांची समाधी आहे. गोविंद गोपाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर अंत्यसंस्कार केले असं मानलं जातं. गोविंद गोपाळ यांच्या वंशजांकडून त्यांच्या समाधीसमोर डिसेंबर 2017 मध्ये तसा बोर्ड लावण्यात आला. मात्र त्यामुळे गावामध्ये वादाला सुरुवात झाली आणि गावातील काही लोकांकडून गोविंद गोपाळ यांच्या समाधीचे नुकसान करण्यात आले. त्यानंतर गावातील अनेकांवर अॅट्रोसिटी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुण्यातील समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी डिसेंबर 2017 मध्ये म्हणजे विजय दिवस साजरा होणार असल्याच्या काही दिवस आधी पुण्यात आणि कोरेगाव भीमा परिसरात पत्रकार परिषदा घेतल्या आणि काही पत्रकही वाटली. या पत्रकांमध्ये विजय स्तंभशी निगडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दावा करत असलेला इतिहास नाकरण्यात आला. मिलिंद एकबोटे हे वढू गावातील समाधीच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून देखील काम करत होते.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 चा दिवस उजाडला . कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय स्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकर अनुयायांची मोठी गर्दी उसळली. त्याचवेळी कोरेगाव पासून काही किलोमीटरवरील वढू गावात हजारहून अधिक तरुणांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर हे तरुण मोटर सायकलवरून कोरेगाव भीमाच्या दिशेने निघाले आणि हा जमाव कोरेगावमध्ये पोहोचला आणि दोन्हीबाजूकडून दगडफेक आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. पुढे जाळपोळ आणि तोडफोडीचे सत्र सुरु झाले. कोरेगाव भीमा या गावाबरोबरच आजूबाजूच्या गावांमध्येही हिंसाचाराचे हे लोन पोहचले. या हिंसाचारात राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला. लोकांच्या मालमत्तांचा नुकसान झालं .
कोरेगाव भीमा येथील या हिंसाचाराचे पडसाद दुसऱ्या दिवशी दोन जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंद दरम्यान मुंबई, पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्रात हिंसक घटना घडल्या. या दिवशी दुपारी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे कारणीभूत असल्याचा आरोप केला. प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपानंतर काही वेळातच पिंपरी - चिंचवडमध्ये भिडे आणि एकबोटेंवर गुन्हा नोंद करण्यात आला. अनिता साळवे या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जेव्हा एक जानेवारीला हिंसाचार सुरु होता तेव्हा आपण भिडे आणि एकबोटेंना घटनास्थळी पहिल्याच या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होत . त्यानंतर हा गुन्हा कोरेगाव भीमा ज्या हद्दीत आहे त्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला . दोन जानेवारीला याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या हिंसाचाराला एक हिंदुत्ववादी नेता कारणीभूत असल्याचा आरोप केला . परंतु पवारांनी या आरोपात त्या हिंदुत्ववादी नेत्याचे नाव घेतले नाही .
मात्र त्यानंतर आठच दिवसांनी म्हणजे 8 जानेवारी 2018 ला एल्गार परिषदेतील व्यक्तींचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याच्या आरोपावरून पुणे शहरात तुषार दामगुडे नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एल्गार परिषदेचा आणि कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचाराचा काहीही संबंध नाही अशी त्यावेळी पुणे पोलिसांची भूमिका होती . नक्षलवाद्यांशी या परिषदेचा संबंध असल्याच्या आरोपावरून सुधा भारद्वाज, वरवरा राव , सुधीर ढवळे , शोमा सेन , सुरेंद्र गडलिंग , महेश राऊत , रोना विल्सन , वर्नन गोंसावलीस , अरुण फरेरा आणि आनंद तेलतुंबडे यांना पुढे या प्रकरणात पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली . या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला .
पोलिसांचा तपास सुरु असतानाच या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारकडून फेब्रुवारी 2018 मध्ये कलकत्ता न्यायालयाचे निवृत्त न्ययाधीश जे . एन . पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सद्वयीय आयोगाची स्थापना करण्यात आली . सुरुवातील या आयोगाची मुदत फक्त चार महिन्यांची होती.परंतु चार वर्षनंतरही आयोगाचे काम सुरूच आहे . या आयोगासमोर आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित अनेकांनी आतापर्यंत लिखित स्वरूपात आणि प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचं म्हणणं मांडलं आहे.
या प्रकरणाचा तपस करणाऱ्या पुणे पोलिसांकडून भिडे आणि एकबोटे यापैकी कोणालाच आधी अटक करण्यात आली नाही . मात्र नयायलयाने फटकारल्यानंतर मार्च 2018 मध्ये मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली. एक महिन्यानंतर एकबोटेला जामीन मंजूर करण्यात आला. त्याचवेळी संभाजी भिडेंचा या हिंसाचाराशी संबंध चौकशीतून आढळून आलेला नाही हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात सांगितलं आणि पुणे पोलिसांचा तपास विधिमंडळाच्या पटलावर ठेवला. त्याचवेळी पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका बदलली आणि कोरेगाव भीम इथल्या हिंसाचारलाही एल्गार परिषद आणि त्यामधील आरोपी कारणीभूत असल्याचा दावा केला .
2019 ला राज्यात सत्तांतर झालं काही दिवसातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन एल्गार परिषदेचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याचबरोबर आपण गृहमंत्र्यांना याबाबत चौकशी करण्यास सांगणार असल्याचंही पवार म्हणाले . त्यानुसार तत्त्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 22 जानेवारी 2019 ला एका आढावा बैठकीचे आयोजन केले. मात्र राज्य सरकार याबाबत काही हालचाल करण्याआधीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून काढून घेऊन तो एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयए करतंय तर दुसरीकडे न्य्यायमूर्ती जे एन पटेल यांचा आयोग समांतर पद्धतीने चौकशी करतो आहे. या आयोगाकडून शरद पवार यांनी त्यांनी दोन जानेवारी 2018 ला केलेले वक्तव्य कशाच्या आधारे केल्याचे आणि त्यांच्याकडे याबाबत आणखी कोणती माहिती आह का याची विचारणा करण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं . त्यानंतर शरद पवारांनी त्यांची याबाबतीतील भूमिका सविस्तरपणे आयोगासमोर मांडली आहे.
संबंधित बातम्या :