Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदवरुन मनसेचा 'मविआ'वर हल्लाबोल, राष्ट्रवादीकडून मनसेवर पलटवार
Maharashtra Bandh : लखीमपूरमधील हिंसाचारानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
Maharashtra Bandh : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) चं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये महाराष्ट्र बंदवरुन खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनंन मात्र या बंदला विरोध दर्शवला आहे. मनसेच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रवादीनं पलटवार केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, "उत्तर प्रदेश मध्ये जी घटना झाली ती दुर्दैवी आहेच त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण मा. वि. अ. चे खासदार जेंव्हा संसदेत शेतकरी विरोधी बिल मांडलं जात होतं तेंव्हा शेपूट घालून का बसले होते?", असा सवाल उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचा मनसेवर पलटवार
लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच. शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे. म्हणजेच, मविआने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली. यावेळी हुतात्मा चौकात शेतकर्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली. 'महाराष्ट्र बंद' मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगतानाच सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले आहेत.
विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Bandh: 'शिवसेनेच्या मनात बंद करणं नव्हतं, खुर्ची टिकवायचीय तर पवारांचं ऐकावं लागतं', भाजपचा आरोप
- Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद
- Maharashtra Bandh : ...यांच्यासाठी आजचा 'महाराष्ट्र बंद', सामनातून माहिती; तर लखीमपूरवरुन मोदींना सुनावले खडेबोल