Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; सभागृहातील गदारोळानंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Disha Salian Case: सध्या दिशा सालियनची केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मुंबई : दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत (Special Task Force) चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) यांची केस सीबीआयकडे (CBI) होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.
विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचं असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका.
शिंदे गटाच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्यानंतर शिंदे सरकार आक्रमक झाले आहे, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्राकडून मागवणार असून महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) पुन्हा तपास करण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा भरत गोगावलेंकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मृत्यूआधी दिशासोबत कोण कोण होतं? दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल गोगावलेंनी सभागृहात उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :