अधिवेशन काळात अजित पवारांना मुख्यमंत्री करा, इतर वेळी उद्धव ठाकरे चालतील; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनाला टोमणा
Maharashtra Assembly Winter Session : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज चांगलं पार पडलं असं सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे.
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सूचनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. संपूर्ण अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृत्ती अस्वास्थामुळे विधीमंडळामध्ये येऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झालं, या काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. म्हणून अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावं आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी सूचना मुनगंटीवारांनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना केली. आता ही सूचना म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका होती अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला."
आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली.
राज्याच्या अधिवेशनाचा काळ हा अत्यंत महत्वाचा असून या काळात महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा केली जाते, अनेक विषय मार्गी लावले जातात. नेमक्या अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांची तब्येत व्यवस्थित नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. या काळात मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्या कोणाकडे द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. पण तसंही घडलं नाही. पण विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेमकी उत्तरं दिली आणि आपल्या कार्यशैलीची, नेतृत्वाची चुणूक दाखवली.
आता याच विषयावरून भाजप नेत्यांनी एकीकडे राष्ट्रवादीला चुचकारलं आहे तर दुसरीकडे नेतृत्वावरून शिवसेना आणि काँग्रेसला टोमणा मारला आहे. त्यामुळे आधीच आघाडीत असलेली बिघाडी येत्या काळात आणखी वाढतेय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- पोलीस जर चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर ते वसुलीच करणार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
- लोकांना सारखी 'ती' पहाट आठवते, मला सांगायचं त्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते; अजित पवारांची खदखद बाहेर
- मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी गैरहजर, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही कॉमेंट केलेली नाही : रावसाहेब दानवे