(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री शिवसेनेचा पण महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे! सर्वाधिक निधीही राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांसाठीच..
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) असले तरी अर्थसंकल्पात या तरतुदीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या खात्यात सर्वाधिक निधी वाटप झाला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री तुमचा परंतु महत्त्वाची खाती आमच्याकडे हे राष्ट्रवादीचे (NCP) जुने सूत्र आहे. राष्ट्रवादी सत्तेत येत असल्यापासून अर्थ विभाग सतत राष्ट्रवादीकडे राहिला आहे. सत्तेच्या या वाटणीचा राष्ट्रवादीला पक्ष वाढीसाठी नेहमी उपयोग झाला. आताही तीच स्थिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) असले तरी अर्थसंकल्पात या तरतुदीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या खात्यात सर्वाधिक निधी वाटप झाला आहे. शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळाला आहे. याबाबत आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आकडेवारी सांगत उल्लेख केला आहे.
महत्त्वाची खाती आणि मंत्री मात्र आमचे, हा राष्ट्रवादीचा पक्ष स्थापनेपासूनचा फंडाच
महत्त्वाची खाती आणि मंत्री मात्र आमचे हा राष्ट्रवादीचा पक्ष स्थापनेपासूनचा फंडाच आहे. अश्या सत्ता वाटपाचा राष्ट्रवादीला पक्ष वाढवण्यासाठी, कार्यकर्ते संभाळण्यासाठी कायम उपयोग झाला आहे. आघाडीच्या पहिल्या 14 वर्ष सहा महिन्याच्या काळात काँग्रेसचे चार मुख्यमंत्री झाले. परंतु त्यामुळे पक्ष वाढला का? तर याचं उत्तर समोर आहे. जशी देशात काँग्रेसची वाताहत झाली तशीच महाराष्ट्रात 44 आमदारापर्यंत काँग्रेस येऊन ठेपली. आता तर सत्तेत असून तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे. पक्षाला मुख्यमंत्री पद न मिळाल्याने अजित पवार भलेही नाराज झाले होते. परंतु पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या खात्यांना मिळत राहिला. आधी काँग्रेस आणि आता काँग्रेस- शिवसेना तक्रार करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या 12 खात्यासाठी तब्बल तीन लाख 14 हजार 820 कोटीची तरतूद झाली
काँग्रेसकडे असलेल्या खात्याला 1 लाख 44 हजार 193 कोटी रुपये इतका निधी मिळाला
तर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या वाट्याला केवळ 90 हजार 181 कोटी खातेनिहाय लाभ झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्व महत्त्वाची खाती आहेत त्यामुळे निधी वाटपातला महत्त्वाचा वाटा मिळतो. यावर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी आक्षेप घेतला होता. सोबतच शिवसेनेच्या 22 आमदारांनी या अधिवेशनावर बहिष्कार घालण्याची भाषा केली होती. मुख्यमंत्री सेनेचा परंतु सेनेलाच सर्वात कमी निधी मिळाला आहे. शिवसेनेच्या वाट्याच्या नगर विकास विभागाला एकूण निधीच्या पन्नास टक्के म्हणजे 44 हजार 306 कोटी एवढा निधी मिळाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला 12 हजार 364 कोटी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला 11 हजार एक कोटी तर कृषी विभागाला 12721 कोटी मिळाले आहेत.
शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा शेतकऱ्यांचा पक्ष अशी आहे. पण राष्ट्रवादीने कधीही कृषी खाते स्वतकडे घेतलेले नाही आणि अर्थ खाते कधीही सोडलेले नाही. हाच राष्ट्रवादीचा सर्वात सुपरहिट फंडा आहे.