Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
MVA Seat Sharing News : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याची माहिती आहे.
मुंबई : येत्या एक दोन दिवसांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंदर्भात माहिती देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाने 140 जागांवर दावा केला असून काँग्रेसने 130 जागांवर दावा केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठीसोबत महाराष्ट्रातल्या जागावाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे पक्षाने 140 जागांवर दावा केला तर काँग्रेसलाही 130 जागा हव्या आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे पक्षात जागावाटपावरून तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. तर शरद पवारांच्या राष्ट्रावादीने विधानसभेसाठी 80 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एकूण 150 जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे. उर्वरित ज्या जागांवर वाद आहे त्यावर पहिला राज्यातच तोडगा काढण्यात येणार आहे. जर तोडगा निघाला नाही तर दिल्लीमध्ये त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला
महाविकास आघाडीतील मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या 23 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 13, कांग्रेस 8 , राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी 1 या जागेवर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे. घाटकोपर पूर्वची जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला असून उरलेल्या 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहावं लागेल. वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. दोन पक्षांमध्ये ती जागा अडचणीची ठरण्याची शक्यता
शिवसेना ठाकरे गटाला कोणत्या जागा मिळणार?
- विक्रोळी विधानसभा
- भांडुप पश्चिम विधानसभा
- दिंडोशी विधानसभा
- अंधेरी पूर्व विधानसभा
- चेंबूर विधानसभा
- कलिना विधानसभा
- वरळी विधानसभा
- शिवडी विधानसभा
- काँग्रेसला मिळणाऱ्या जागा
- मालाड पश्चिम विधानसभा
- धारावी विधानसभा
- मुंबादेवी विधानसभा
- वांद्रे पश्चिम
- चांदीवली विधानसभा
- कांदिवली पूर्व
महाविकास आघाडीकडून सलग तिसऱ्या दिवशी जागावाटपासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 150 जागांवर तीनही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित जागांवर चर्चा अद्याप सुरू आहे.