काँग्रेसने विदर्भात 62 जागांवर दावा केला तर उर्वरित जागांवर आम्ही दावा करू, नितीन राऊत यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
नितीन राऊत यांनी विदर्भातील 62 जागांवर आपला दावा केला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सुतोवाच नितीन राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Nagpur News नागपूर : नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी विदर्भातील 62 जागांवर दावा केला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या जागा आम्ही लढवणार, असे सुतोवाच नितीन राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू. त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असे देखील ते म्हणाले. नितीन राऊत हे आमचे मित्र आहेत. विदर्भाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळं प्रेम आहे. तर त्यांना 62 जागा हव्या असतील तर बरं होईल, ते मग 62 जागावरच लढणार, असा मिश्किल टोला देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना लगावला आहे.
राहुल गांधी हे पंतप्रधानाचा चेहरा 25 ते 30 जागांवर फरक पडला असता
महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकदिलाने लढणार आहोत. आमच्या मनात कुणा विषयी कटूता नाही. या राज्याचे नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं, ही आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. त्याच उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या बैठकीत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्रीपदासाठी उद्या कुठलाही चेहरा असेल त्याला आम्ही सहकार्य करू, या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असला तर उत्तम राहील. कारण लोक चेहरा पाहून आपलं मत बदलतात. जर राहुल गांधी हे पंतप्रधानाचा चेहरा म्हणून ते वेळीच पुढे आले असते तर मला खात्री आहे की 25 ते 30 जागांवर नक्कीच फरक पडला असता.
एक रित्या आणीबाणी पेक्षा भयंकर हे दिवस
सत्ताधारी जर काळा दिवस पाळत असतील तर काय आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता का? अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, हेमंत सुरेंद्र, राज्यातील नवाब मलिक इत्यादी अनेक नेत्यांवर ठरवून अत्याचार करण्यात आले. एक रित्या आणीबाणी पेक्षा भयंकर हे दिवस होते. त्यामुळे जेव्हा आमचे दिवस येतील हे सगळे दिवस आम्ही काळे दिवस म्हणून पाळू, असेही संजय राऊत म्हणाले. तर अनिल देशमुख यांना काटोल पर्यंत मर्यादित ठेवणार, की संपूर्ण महाराष्ट्रात ते काम करतील? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, अनिल देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री राहिले असून ते या महाराष्ट्राचे नेते आहेत. नक्कीच विदर्भात त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. मात्र गेल्या लोकसभेच्या वेळी देखील ते प्रचारात महाराष्ट्रभर उतरले होते, तसेच ते या वेळेला देखील राज्यात उतरणार आणि आम्हाला मोठा विजय मिळेल. असा विश्वासही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या