Maharashtra assembly Budget session 2025 : 3 ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा केला जाणार, अजितदादांची अर्थसंकल्पावेळी मोठी घोषणा
Maharashtra assembly Budget session 2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सादर केला आहे.

Maharashtra assembly Budget session 2025 : मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून केंद्राने दर्जा मिळवून दिला आहे, त्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता यापुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात केली, राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मांडताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून दिला आहे.
"भाव फुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळुन, तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून…", अशा शब्दांमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. आपल्या माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’
यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर या ठिकाणी अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.























