आषाढी एकदशी : मानाच्या दहा पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान, तर महापूजेसाठी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत रवाना
मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.
पंढरपूर : पंढरपूरआषाढी यात्रेनिमित्त मानाच्या पालख्या हळूहळू पंढरपुरात दाखल होत आहेत. टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या दहा पालख्या पंढरपुरात दाखल होतील. कोरोना संकटामुळे केवळ मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत चांगावटेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत निळोबा महाराज पालखी, संत मुक्ताबाई पालखी या मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरकडे रवाना
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरातील महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी दोन वाजता पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत पंढरपूरला रवाना झाले आहेत. खराब हवामानामुळे विमानाने मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ते रस्तेमार्गाने पंढरपूरला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्राईव्हिंग सीटवर होते. मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीनिमित्त महापुजेला उपस्थित राहण्याचं उद्धव ठाकरे यांचं हे दुसरं वर्ष आहे.
पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी
आषाढी यात्रेसाठीआजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आषाढीसाठी काही मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे तर काही वेळात उर्वरित पालख्याही पंढरीच्या दिशेनं रवाना होतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षांपासून एसटी बसनं या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत. गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.