Maharashtra Headlines 29th June : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर, दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा, मुख्यमंत्र्याचं विठुरायाला साकडं
आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा मान मला मिळाला, त्यामुळं मी स्वता:ला भाग्यवान समजतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. वाचा सविस्तर
वादग्रस्त जाहिरातीबद्दल शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. त्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी चूक मान्य केली, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि आमच्या काही लोकांनी चूक केल्याचे शिंदेंनी सांगितले, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता फडणवीसांनी पडदा टाकला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर
कोरोनाकाळात आरोग्यदूत म्हणून मिरवलं, नाशिकचा तुषार जगताप निघाला गुटखा माफिया!
नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वाचा सविस्तर
तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस कर्मचारी निलंबित
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाचा सविस्तर
उल्हासनगरच्या विजयलक्ष्मी ज्वेलर्समधून 6 किलो सोन्याची चोरी, आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सांगली आणि जळगावमधील चोरीची घटना ताजी असतानाच मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली. विजयलक्ष्मी ज्वेलर्समधून तब्बल सहा किलो सोन्याची चोरी झाल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका वॉचमनने दुकान बंद असल्याचा फायदा घेत आपल्या साथीदारांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचे दागिने (Jewellery) लंपास केले. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. वाचा सविस्तर