Mahajyoti Fellowship: वेळ रात्रीची, किर्रर्र अंधार, डासांच्या कात्रीत सापडलेले आंदोलक अन् महाज्योती फेलोशिपची मागणी
महाज्योती फेलोशिप मिळण्यासाठी विद्यार्थी आंदोलकांचे किर्रर्र अंधारात आणि डासांच्या घेऱ्यात उपोषण सुरु, महाज्योतीचा प्रश्न कधी मार्गी लागणार? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच..
Chhatrapati Sambhajinagar: वेळ रात्रीची. किर्रर्र अंधार. अंधारात चहूबाजूंनी डासांच्या कात्रीत सापडलेले अन् भविष्यावर टांगती तलवार असणारे विद्यार्थी आंदोलक. असे चित्र सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालयासमोर दिसते आहे. उपोषणाचं कारण आहे संशोधन पूर्ण करण्यासाठी महाज्योती फेलोशिप मिळावी हे.
तसे पहायला गेलो तर दोन मुली आणि तीन विद्यार्थ्यांचे आंदोलन, असा प्रत्यक्षदर्शी समज होत असला तरी राज्यभरातील शेकडो पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला जोडणारा हा धागा. मागील चार दिवसांपासून हे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयासमोर बसले आहेत. काल या विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात आली खरी पण महाज्योतीचा प्रश्न कधी मार्गी लागणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे.
महाज्योती फेलोशिपमधून PHD संशोधकाला मिळतात..
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने ओबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशिप देण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला होता. या फेलोशिपमध्ये संशोधन करणाऱ्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला पहिल्या दोन वर्षात ३१ हजार रुपये प्रति महिना तर पुढील तीन वर्ष ३५ हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येतात. या आधीच्या वर्षीही अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यास अडचणी आल्याच्या तक्रारी समोर आल्या असून प्रत्यक्षात फिलोशीप देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
विद्यार्थी संशोधन थांबवण्याचा तयारीत..
मागील वर्षी उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. यासाठी उच्चस्तरीय समितीला अहवाल पाठवण्यासाठीही सांगण्यात आले होते. मात्र तो अहवाल अजून आला नसून अनेक विद्यार्थी संशोधनाचे काम थांबवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI