Mahadev Jankar : महादेव जानकर परभणीतून निवडणुकीच्या रिंगणात; राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला जागा सोडली
Mahadev Jankar : राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणीमध्ये महादेव जानकर हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीतून माढा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना दिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मोठी खेळी करत महादेव जानकर यांना एक जागा देऊ करत महायुतीमध्ये परत आणले होते. आता महायुतीमधून महादेव जानकर हे परभणीमधून अधिकृत उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
परभणीमध्ये महादेव जानकर हे लोकसभेच्या रिंगणात असणार
राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणीमध्ये महादेव जानकर हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी होणार आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याची माहिती दिली. रायगडमधून सुनील तटकरे हे रिंगणात असणार आहेत. बारामती मधून सुनेत्रा पवारांची उमेदवार निश्चित आहे, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असणार आहे. दरम्यान, बारामतीच्या जागेवरती आज घोषणा केली जाणार का? याकडे लक्ष होते. मात्र अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, तेथून बंड केलेल्या विजय शिवतारे यांना शांत करण्यात यश आलं आहे.
चर्चा माढा, बारामतीची पण मिळाली जागा परभणीची
महादेव जानकर यांनी गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये छोट्या पक्षांना मिळत असलेल्या वागणुकीवरून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांना गरज नसल्यास आम्ही सुद्धा बांधिल नसल्याचे म्हटले होते. यानंतर शरद पवार यांनी जानकरांची नाराजी हेरत त्यांना माढाची जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित करण्यात आली होती. मात्र, एकेका जागेसाठी संघर्ष सुरु असल्याने महायुतीच्या नेत्यांनी जानकरांची नाराजी दूर करत त्यांना एक जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना माढा, बारामती आणि परभणी असे तीन पर्याय समोर होते. मात्र, आता अजित पवारांच्या कोट्यातून त्यांना परभणीची जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी कायम राहून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार असतील, हे निश्चित झाले आहे. बारामतीमध्ये विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या