अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती, महादेव जानकर यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Mahadeo Jankar on BJP : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mahadeo Jankar on BJP : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महादेव जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता म्हणाले अजित पवार आल्यावर फायदा होईल. तर परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला साराच बेस निघून गेला, असा टोला फडणवीस यांना लगावलाय... तसेही भाजप एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती, असा टोलाही जानकर यांनी लगावला आहे.. तर गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते... मात्र आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्या पेक्षा हुशार आहेत, असा खोचक टोला जानकर यांनी लगावला आहे. त्यांना आमची गरज नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागणे यात काही अर्थ नाही असंही जाणकर यांनी म्हटलंय.
राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर यात्रा सुरू केली असून, ही यात्रा काही कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या, युवकांच्या सर्वसमान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात ही रथ यात्रा काढली असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यात त्यांची रथ यात्रा आली असता ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रीय समाज पक्ष 543 जागा लढवणार - जानकर
राष्ट्रीय समाज पक्ष देशात आगामी लोकसभेच्या निवडणुका सबळावर लढणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली... लोकसभेच्या 543 जागा आम्ही लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळत चालली आहे. काही राज्यांमध्ये विजय देखील मिळेल तर स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून निवडणूक लढणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.
पंकजा मुंडेबद्दल काय म्हणाले जानकर ?
पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलले जात असल्याची चर्चा नेहमीच रंगते , यावर बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत... त्यांना जर भाजपमध्ये जास्तच त्रास झाला तर आम्ही बहीण म्हणून साडी चोळी घेऊन त्यांना आणायला जाऊ...राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून त्यांना काय करायचं ते करू...आता मी फक्त त्यांना एवढंच म्हणेल "दिल्या घरी सुखी रहा" असं जानकर म्हणाले.