टिकटॉक व्हिडीओंमुळे प्रेम जडलं, मध्य प्रदेशातील तरुणी वर्ध्याच्या तरुणाशी विवाहबद्ध
प्रेम या एका शब्दातच मोठी किमया दडली आहे. आता सोशल मीडियावरही प्रेम खुलतं. यामध्ये अनेकांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात होतं. टिकटॉक व्हिडीओतून एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर मध्य प्रदेशातील तरुणीने वर्ध्याच्या तरुणासोबत सहजीवनाची गाठ बांधली.
![टिकटॉक व्हिडीओंमुळे प्रेम जडलं, मध्य प्रदेशातील तरुणी वर्ध्याच्या तरुणाशी विवाहबद्ध Madhya Pradesh girl and Wardha boy fall in love due to Tik Tok video, ties knot टिकटॉक व्हिडीओंमुळे प्रेम जडलं, मध्य प्रदेशातील तरुणी वर्ध्याच्या तरुणाशी विवाहबद्ध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/22193528/Wardha-TikTok-Marriage.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वर्धा : आजकाल अनेकांना सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्याचा करायला आवडतं. अशा लोकांसाठी टिकटॉक हा आवडता प्लॅटफॉर्म होता. आर्वीतील एक युवकही नृत्याचे, अभिनयाचे वेगवेगळे व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करायचा. त्यावेळी त्याला यातून जीवनाचा साथीदार मिळेल, याची कल्पनाही नसावी. त्याचे व्हिडीओ मध्य प्रदेशातील एका तरुणीला आवडू लागले.. तिने त्याचं टिकटॉक अकाऊंट फॉलो करायला सुरुवात केली. काही महिने टिकटॉकवरच हाय-हॅलो झालं आणि प्रेम खुलू लागलं.
तिनेच पुढाकार घेऊन त्याला प्रपोज केलं आणि त्यानेही होकार दिला. कधीही एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेले हे युगुल एकमेकांमध्ये पुरतं गुरफटलं. दोघांनी कधीच कोणती गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. आजारामुळे होणाऱ्या शस्त्रक्रियेतून सुखरुप वाचले तर एकदा नक्की भेटायला येईन असा शब्द तिने दिला. त्याचा जीवही कासावीस होऊ लागला. तिच्यासाठी त्यानेही प्रार्थना केली. प्रार्थना फळाला आली आणि आजारावर मात केल्यानंतर तिने आर्वी गाठलं.
युवकालाही ती आवडायची. तोही तिचे व्हिडीओ लाईक करायचा. सतत तिच्याच विचारात मग्न असायचा. तिच्यासाठी प्रार्थना करायचा. ती थेट मध्यप्रदेशातून आर्वीत आल्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तडक त्याने बसस्टॅण्ड गाठून तिची भेट घेतली. एकमेकांना पाहून दोघांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. मुलाने घरच्यांची समजूत काढून यवतमाळला जाऊन लग्न केलं. पुढील अडचणी टाळण्यासाठी पोलिसांना माहिती दिली.
थेट स्वत:चं घर आणि राज्य सोडून तिने प्रियकराचं गावं गाठलं. टिकटॉकवरुन जुळलेलं प्रेम आता लग्नबांधनात अडकलं आहे. त्याचं प्रेम असंच चिरकाल राहो आणि सहजीवन आनंदात राहावं, एवढ्याच शुभेच्छा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)