(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Opinion Poll: पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे का? पाहा एबीपी माझाचा ओपिनियन पोल
ABP Majha Opinion Poll: सध्या देशासह राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहतायत. त्यातच आता एबीपी माझाचा ओपिनियन पोल समोर आला आहे.
मुंबई : अवघ्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. उद्या म्हणजेच 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाची (Election Comission) पत्रकार परिषद पार पडणार असून लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेच्या पूर्वसंध्येला सध्याच्या घडीला एबीपी माझाचा महाओपिनयन पोल (ABP Majha Opinion Poll) समोर आला आहे. यामध्ये जनतेचा कौल समोर आला असून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कामावर महाराष्ट्राची जनता समाधानी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल समोर आला आहे. या ओपनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, तर 20 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. महाविकास आघाडीचा 20 जागांवरील विजय हा महायुतीसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी आहे का?
एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? यामध्ये महाराष्ट्रातील 42 टक्के जनतेने आम्ही समाधानी आहोत, असे सांगितले आहे. तर 27 टक्के जनतेने आम्ही मोदींच्या कामगिरीवर काहीसे समाधानी आहोत, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे का?
एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 32 टक्के लोकांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 29 टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या कामगिरीबाबत फक्त समाधानी आहेत. तर 32 टक्के लोकांनी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर अजिबात समाधानी नसल्याचे म्हटले आहे. तर 7 टक्के लोकांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येणार नाही, असे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?
एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 42.7 टक्के इतकी मतं मिळतील. 2019 मध्ये एनडीएला एकूण 50.88 टक्के मिळाली होती. ही भाजप आणि शिवसेनेला मिळालेली मतं होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल 8 टक्क्यांनी घट होईल. तर 2019 मध्ये यूपीए आघाडीला 32.24 टक्के मतं मिळाली होती. मात्र, आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या समावेशानंतर तयार झालेल्या इंडिया आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 42.1 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना यंदाच्या निवडणुकीत 15.1 टक्के मतं मिळतील.