Lok Sabha Election : मतदानावरील बहिष्काराचा सिलसिला सुरुच! बीडच्या केजमध्ये दहा वर्षांत दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार,नेमकं कारण काय?
Lok Sabha Election 2024 : आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय. मात्र अनेक गावांमध्ये आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गावकऱ्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Lok Sabha elections 2024 Phase Four : देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय. आज राज्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये मैदान मारण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनातील सर्व स्थरातील यंत्रणा देखील कामाला लागली आहे. असे असले तरी राज्यातील काही गावांमधील ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदानावरील बहिष्काराचा सिलसिला चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्येही सुरुच असल्याचे चित्र असून त्याचा थेट फटका मतदानाच्या टक्केवारी आणि उमेदवारांना देखील बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केजमध्ये दहा वर्षांत दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी दहा वर्षात चक्क दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दहा वर्षांपूर्वी कोरडेवाडी गावतील साठवण तलावाचा मुद्दा घेऊन ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले होते. मात्र, त्यावेळी प्रशासनाच्या वतीने हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन देण्यात आलं आणि त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान केलं होतं. मात्र, गेल्या दहा वर्ष हा मुद्दा तसाच असल्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी बहिष्कारचा निर्णय घेतला आहे. मागील 25 वर्षापासूनचा एकच प्रश्न जर सुटत नसेल तर आम्ही मतदान का करायचं? असं थेट सवाल प्रशासनाला ग्रामस्थांनी विचारला आहे.
लेखी आश्वासन शिवाय माघार नाही
कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यानंतर या ठिकाणी तहसीलदार येऊन गेले आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्याची पूर्तता होईल असे लेखी आश्वासन दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश येतं का, की गावकरी आपल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जळगावच्या रामदेववाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
अपघातास जबाबदार असलेल्यांवर तातडीने अटकेची कारवाई करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी गावातील ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार घातला आहे. गेल्या चार दिवसपूर्वी रामदेववाडी येथील एका अंगणवाडी सेविकेसह एकूण चार जणांचा कारने धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघातास जबाबदार असलेल्या विरुद्ध तातडीने अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणी साठी रामदेववाडी गावच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातलाय. परिणामी, या परिसरातील मतदान केंद्रवरील निवडणूक कर्मचार्यांवर मतदान केंद्रातच बसून राहण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या