निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अतिक्रमित जागेचे बनावट उतारे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड
निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अतिक्रमित जागेचे बनावट उतारे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गाव ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे.
जळगाव : एखाद्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू, मटण पार्ट्या किंवा पैसे देण्याचे प्रकार आपण पाहिले असतील. पण अतिक्रमित जागा आपल्या नावावर करून देत असल्याचं भासावत त्या जागेचे चक्क बनावट उतारे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गाव ग्रामपंचायतीच्या गावठाणच्या जागेवर गावातील अनेक ग्रामस्थांनी अतिक्रमण करून घरे बांधुन आपला रहिवास सुरू केला आहे. मात्र, ही जागा अतिक्रमित असल्याने ती नावावर होऊ शकत नाही. परिणामी या ठिकाणच्या रहिवाश्यांना विविध अडचणीचा सामना हा करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत तात्कालीन सरपंच आणि सदस्यांनी या गोष्टीचा फायदा उठवीत अतिक्रमण धारकांना या जागा आपल्या नावावर करून देण्यात येतील. मात्र, त्यासाठी आपल्याला काही रक्कम द्यावी लागेल असे आश्वासन दिल्याने अनेक अतिक्रमण धारकांनी जागा आपल्या नावावर होणार असल्याच्या आशेने कोणी पंचवीस हजार तर कोणी चाळीस हजार रुपये देणे पसंत केले. हे पैसे देऊनही सदर जागेचे मालकी हक्क उतारा मिळत नसल्याने अनेकांनी ग्रामपंचायतीकडे तगादा लावला. मात्र, त्यात त्यांना यश मिळत नव्हते.
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए..
मात्र, म्हणातात ना दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए अगदी तसाच प्रकार या लोहारा ग्रामपंचायतीत पाहायला मिळाला. दोन हजार एकोणीसचd/e निवडणुकीत सदर पैसे घेतलेले अतिक्रमणधारक आपल्याला घर नावावर करून दिले नाही म्हणून मतदान करणार नाहीत याची जाणीव तात्कालीन ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना झाल्यानं त्यांनी निवडणुकीच्या अगदी तोंडावर 430 अतिक्रमण धारकांना चक्क घरे नावावर करून देत असल्याचे बनावट उतारे वाटप करून मतदान आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही.
सत्तांतर झाल्यानंतर प्रकार उघडकीस..
ग्रामपंचायतीमध्ये नंतर सत्तेत आलेल्या सरपंच अक्षय जैस्वाल यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली असता सदर प्रकार नुकताच उघडकीस आला असल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरपंच मालतीबाई पाटील, उपसरपंच कैलास पाटील, ग्रामसेवक आरटी भिसाने, संगणक चालक प्रल्हाद चौधरी यांच्या विरोधात विद्यमान सरपंच अक्षय जैस्वाल यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली आहे. सदर फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात यावी. अशी मागणीही विद्यमान सरपंच अक्षय जैस्वाल यांनी केली आहे.
आपण गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे गावठाण जागेवर राहत आहोत. ही जागा आपल्या नावावर करून देत आहोत त्या बदल्यात काही रक्कम आपल्याला द्यावी लागेल असं आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे जागेच्या किमतीचा विचार करता मागण्यात आलेली रक्कम ही अतिशय कमी असल्याने आम्ही ती रक्कम त्यांना दिली. मात्र, पैसे देऊन सुद्धा वर्षभर घरे नावावर करून देण्यात आली नाहीत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला घरे आमच्या नावावर करून देत असल्याचे उतारे घरपोहच आणून देण्यात आले. याविषयी गावात कोणाजवळ चर्चा करू नका, असं सांगितले. या घटनेनंतर आम्हाला घराच्या नवीन उताऱ्याचं काम पडल असता नवीन उतारा मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला नवीन उतारा मिळू शकला नाही. आपल्या नावाचं रेकॉर्ड ग्रामपंचायतीकडे नसल्याचं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. याच वेळी मागील काळातील ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांकडून आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आले. एकतर ग्रामपंचायतीने जागा आमच्या नावावर करून द्यावी अथवा आमचे घेतलेले पैसे परत द्यावे अशी मागणी फसवणूक झालेले ग्रामस्थ आता करताना दिसून येत आहे.