लॉकडाऊनच्या काळात 30 हजार महिलांना मिळाली जगण्याची नवी उमेद
संपूर्ण देश हा दोन ते अडीच महिन्यासाठी लॉकडाऊनमध्ये होता, या काळामध्ये राज्यभरातील तब्बल साडेचार हजार बचत गटातील महिलांनी 80 लाख मास्क बनवले आहेत.
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या काळातच अनेक लोक बेरोजगार झाले, अनेकांचे व्यवसाय बंद पडले. मोठे उद्योग सुरू झालेले नाहीत, मात्र याच काळात राज्यभरातील जवळपास तीस हजार महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आणि यातूनच या महिलांना जगण्याची नवी उमेद पाहायला मिळाली. ही सकारात्मक बातमी आहे राज्यभरातील बचत गटांच्या महिलांनी मागच्या दोन-अडीच महिने केलेल्या कामाची. राज्य लॉकडाऊनमध्ये असताना या महिलांना रोजगार मिळाला कसा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या संकट काळातसुद्धा संधी शोधण्याचं काम बचत गटांच्या महिलांनी करून दाखवलं आहे.
कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राथमिक पातळीवर मास्क महत्त्वाचं साधन होतं. राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना मास्कची मागणीही वाढत होती. म्हणूनच राज्यभरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या बचत गटाचे काम करणाऱ्या महिलांनी मास्क बनवायचं काम सुरू केलं.
राज्यामध्ये महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून मोठी आर्थिक साक्षरता मिळवली आहे. विशेष म्हणजे जेव्हा संपूर्ण देश हा दोन ते अडीच महिन्यासाठी लॉकडाऊनमध्ये होता, या काळामध्ये राज्यभरातील तब्बल साडेचार हजार बचत गटातील महिलांनी 80 लाख मास्क बनवले आहेत.
मास्क कसे बनले जीवन जगण्याचा आधार
बीड तालुक्यातील बोरगावमधील रमेश शिंदे हे हे बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करायचे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांचं हे कामही बंद झालं. आता पुढे संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न रमेश शिंदे यांच्यासमोर होता. त्यांच्या पत्नी शितल शिंदे या घरगुती शिलाई काम करायच्या. बचत गटाच्या इतर महिलांनी त्यांना निरोप दिला की आपण मास्क शिवण्याचे काम करू आणि मग काय शितल शिंदे यांनी मास्क शिकवायला सुरुवात केली..
शितल यांचे पती रमेश शिंदे यांनाही दुसरं काही काम नव्हतं, त्यांनीही या कामात आपल्या पत्नीला हातभार लावायला सुरुवात केली. बघता बघता या दाम्पत्याने अडीच महिन्याच्या काळामध्ये 22 हजार रुपयाचे मास्क शिवून विकले.
बीड तालुक्यातील पेंडगावच्या समीरन बचत गटाच्या महिला यापूर्वी मसाले, चटणी बनवायच्या. आता मात्र मागच्या दोन महिन्यात या महिलांनी 26 हजार मास्क शिवून विकलेत. आता तर या मास्कला इतकी मागणी वाढलीय की, या महिला दिवसभर फक्त मास्क शिवायचेच काम करतायेत. या बचत गटाच्या प्रत्येक महिलेने दोन महिन्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची कमाई केली आहे.
सध्या लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला तरी कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या मास्कला मागणी तर आहेच, पण आता परराज्यातून सुद्धा हे मास्क मागितले जात आहेत. राज्यभरातील तीस हजार महिलांनी मास्क शिवण्याचे काम केले. अडीच महिन्यामध्ये तब्बल 80 लाख मास्क या महिलांनी तयार करून विकले आहेत.
राज्यातील जवळपास साडेचार लाख स्वयंसहाय्यता गट काम करताहेत. कोरोनाच्या संकट काळातही स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी मास्कची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. जवळपास राज्यभरातील तीस हजार महिलांनी 80 लाख मास्कची निर्मिती केली आहे. राज्यभरातील 50 लाख कुटुंब आज या स्वयं सहायता गटा सोबत जोडलेले गेले आहेत.