तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
थोरात यांनी 8 ऑक्टोबर 1959 चे टिपण दाखविले तेव्हा नेहरुंना मोठा धक्का बसला! त्यांनी संतापून विचारले, "मला हे टिपण का दाखविले गेले नाही?" थोरात म्हणाले, "हा प्रश्न आपण मेननसाहेबांना विचारायला हवा !"

Lieutenant General Shankarrao Pandurang Patil Thorat: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे लष्करी सामर्थ्य अवघ्या जगाने पाहिलं. स्वदेशी बनावटीच्या मिसाईलने पाकिस्तानची अवघ्या काही मिनिटांमध्ये दाणादाण उडवून दिली. आज भारत लष्करी सामर्थ्यांमध्ये स्वयंपूर्ण होत चालला असला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची लष्करी स्थिती तोळामासाची होती. या तोळामाच्या स्थितीमध्ये देश उभा करण्याचा आव्हान तत्कालीन नेतृत्वासमोर होतं. त्याचवेळी चिनी आक्रमण सुद्धा भारतासमोर आव्हान होते. त्यामुळे चिनी आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी कोणतीही पायाभूत सुविधा नसताना 'आगे बढो' धोरण सुद्धा भारताच्या मुळावर आलं. चीनने केलेल्या आक्रमणानंतर भारताला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये चीनी साम्राज्यवादाचा धोका सांगण्याचे अवघ्या दोन व्यक्तींनी केलं होतं. यामध्ये कोल्हापूरचे लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात आणि त्यांचे सहकारी आणि आयुष्यभरासाठी जिगरी दोस्त झालेले के. एस. थिमय्या. तारुण्यापासून ते एकत्रित देशाची सेवा करण्यापर्यंत दोघे एकत्र राहिले.
देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या संचलनातही थोरात
थोरात यांच्या प्रयत्नांमुळेच पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी महाराष्ट्रात येऊ शकली. ही महत्वाची राष्ट्रीय संस्था महाराष्ट्रात स्थापन करण्यात मोलाचा वाटा आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी थोरात यांच्या लष्करी कारकिर्दीला सलाम करत निवृत्तीनंतर एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या संचलनातही थोरात होते. दिल्ली एरियाचे कमांडर या नात्याने थोरात संचलनाचे प्रमुख होते. त्यावेळी सैन्यदलाकडून नेहरुंना मानवंदना देण्यात आली तेव्हा ओपन जीपमध्ये थोरात सोबत होते. शंकर पांडुरंग थोरात-पाटील यांचा जन्म 12 ऑगस्ट 1906 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील वडगाव येथे झाला. थोरात शेतकरी कुटुंबातील असले तरी त्यांचे वडील डॉ. पांडुरंग चिमणाजी पाटील उच्चविद्याविभूषित होते. शंकर थोरात यांचे शिक्षण पुण्यातील पूना हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालयात झाले. 1923 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1924 ते 1926 दरम्यान इंग्लंडमधील सॅण्डहर्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये त्यांचे सैनिकी शिक्षण झाले. 10 ऑगस्ट 1992 रोजी त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. त्यांना पद्मश्री आणि किर्तीचक्रने सन्मानित करण्यात आलं होतं.
इंग्लंडमधील सँडहर्स्टसाठी हिंदी तरुणांना संधी देण्याची मागणी 1922 मध्ये मान्य करण्यात आल्यानंतर पहिल्या तुकडीत फक्त चौघांचा समावेश होता. यामध्ये शंकरराव थोरात आणि थिमय्या होते. शंकरराव थोरात यांनी आपलं आत्मचरित्र From Reveille to Retreat मध्ये संपूर्ण लष्करी अध्याय मांडला असून तो आजही एक लष्करी अभ्यासाचा दस्तावेज म्हणून पाहिला जाईल, असाच आहे. चीनची सीमारेषेवर आजही मोगलाई सुरु असतानाच थोरात यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात नेफा (नेफा, जे नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीचे संक्षिप्त रूप आहे, ते ब्रिटिश राजवटीत आणि स्वतंत्र भारतात 1972 पर्यंत एक प्रशासकीय विभाग होता. 1972 मध्ये ते अरुणाचल प्रदेश नावाचा केंद्रशासित प्रदेश बनला आणि नंतर 1987 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.) पायी पिंजून काढला. थोरात यांनी चीनी साम्राज्याचे धोके आणि चीन आक्रमण कोणत्या ठिकाणावरून करू शकते याचे टिपण तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांना दिले होते. मात्र, मेनन यांनी या टिपण पंतप्रधानांपर्यंतही येऊ दिलं नाही. थोरात प्रदीर्घ लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात चीनने आक्रमण केले.
शंकरराव थोरात यांच्या From Reveille to Retreat आत्मचरित्राचा 'माझी शिपाईगिरी'चा मराठी अनुवाद दि. वि. गोखले यांनी केला आहे. या पुस्तकामध्ये प्रस्तावना ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर संस्मरण शंकरराव थोरात यांचे चिरंजीव नाबार्डचे माजी यशवंतराव थोरात यांनी लिहिलं आहे.
'आगे बढो' धोरणाबद्दल कटू सत्य सांगावयास कचरले नाहीत
जयसिंगराव पवार आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, सॅन्डहर्स्टने जनरल थोरातांना एक कर्तव्यदक्ष अधिकारीच नव्हे तर एक 'सद्गृहस्थ' (Gentleman) म्हणूनही तयार केले. 'जो मनुष्य सत्य सांगण्यास' भितो तो नैतिकदृष्ट्या भेकड असतो आणि भेकड मनुष्य कधीही यशस्वी अधिकारी होऊ शकत नाही, हे त्यांचे प्रशिक्षक मे. ज. कॉक्रन यांनी एका प्रसंगी काढलेले उद्गार ज.थोरातांनी आपल्या मनःपटलावर कोरून ठेवले होते आणि म्हणूनच पुढे पंतप्रधान पं. नेहरू व त्यांचे लाडके सहकारी कृष्ण मेनन यांच्या 'आगे बढो' (Forward Policy) धोरणाबद्दल कटू सत्य सांगावयास ते कचरले नाहीत. संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी दबाव आणूनही त्यांनी नेफात 'आगे बढो'चे धोरण अमलात आणले नाही. अर्थात याची किंमत जनरलसाहेबांना द्यावी लागली. ज. थिम्मयानंतर सरसेनापतीपदावर त्यांचीच निवड होणार हे निश्चित असता केवळ संरक्षणमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे हा सन्मान त्यांना मिळू शकला नाही! त्यामुळे तेच नव्हे तर महाराष्ट्र या उचित सन्मानापासून वंचित राहिला.
ज. थोरातांचे भाकीत खरे ठरले, ते पंतप्रधानांना दाखविलेच नाही
'आगे बढो' धोरण म्हणजे आपले लष्कर मॅक्मोहन रेषेच्या जवळ नेणे. अशी ठाणी सरहद्दीजवळ उभारण्यासाठी आपल्याजवळ जी दळणवळणाची रस्ते, पूल आदी साधने, शस्त्रास्त्रांची तयारी या गोष्टींची वानवा असल्याने आणि नेफाची संरक्षणव्यवस्था आर्मीकडे नसल्याने अशी ठाणी उभारून निष्कारण चीनला डिवचून त्याला आक्रमण करण्याची संधी देऊ नये, तशा प्रकारच्या युद्धास आपली काहीच तयारी नाही, अशा आशयाचे एक विस्तृत टिपण पूर्व विभागाचे सेनापती म्हणून जनरलसाहेबांनी सरसेनापती ज. थिम्मया यांच्या शिफारशीसह कृष्ण मेननकडे पाठविले होते. पण चीन कधी भारतावर आक्रमण करणारच नाही, अशी खात्री बाळगणाऱ्या मेनननी ते पंतप्रधानांना दाखविलेच नाही!
टिपणाची तारीख होती 8 ऑक्टोबर 1959 आणि 8 मे 1961 रोजी सरसेनापती ज. थिम्मया आणि ज. थोरात आर्मीतून सेवानिवृत्त झाले! पुढे तीनच वर्षांनी ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून त्यांच्या फौजांनी उज्ज्वल परंपरा असलेल्या भारतीय फौजांचा धुव्वा उडविला! दरम्यान आपले आवडते 'आगे बढो' धोरण मेनन व पंतप्रधानांच्या खास मर्जीतले ज. कौल यांनी अमलात आणले होते. ज. थोरातांचे भाकीत खरे ठरले होते. ज. थिम्मया व ज. थोरात लष्करी सेवेत असेतो या धोरणाची अंमलबजावणी त्यांच्या विरोधामुळे झाली नव्हती. हे दोघेही मेनन यांच्याकडून 'आगे बढो'चा लेखी आदेश मागत होते. तो द्यावयास मेनन तयार नव्हते.
संरक्षण मंत्र्यांच्या इच्छेपुढे नमले नाहीत
या ठिकाणी जनरलसाहेबांच्या चरित्रामधील या घटनेची विस्तारपूर्वक दखल एवढ्यासाठी घेतली की ही घटना त्यांच्या जीवनातच नव्हे तर भारताच्या इतिहासात महत्त्वाची ठरली आहे. संरक्षण मंत्र्यांच्या इच्छेपुढे ते नमले नाहीत. कटू सत्यासाठी त्यांनी स्वतःच्या बढतीपेक्षाही देशाचे हित सर्वोच्च मानले! चिनी आक्रमणानंतर पंतप्रधान पं. नेहरूंनी ज. थोरातांना खास पाचारण करून त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्या वेळी त्यांना जनरलसाहेबांनी 8 ऑक्टोबर 1959 चे टिपण दाखविले तेव्हा पंडितजींना मोठा धक्का बसला! त्यांनी संतापून विचारले, "मला हे टिपण का दाखविले गेले नाही?" जनरलसाहेब त्यावर एवढेच म्हणाले की, "हा प्रश्न आपण मेननसाहेबांना विचारायला हवा !"
"अशा रीतीने माझा सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला!"
याच मुलाखतीत पंडितजींच्या ध्यानात आले की या तत्त्वनिष्ठ व कर्तव्यदक्ष सेनानीने मेननचा रोष ओढवून घेऊन देशासाठी सर्वोच्च त्याग केला आहे! त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले गेले असते तर चिनी फौजांकडून पराभूत होण्याचा कलंक देशाला लागला नसता ! पण घटना होऊन गेली होती. आता कठोर आत्मपरीक्षण करून पुढची पावले टाकण्याचे पंडितजींनी ठरविले. त्यातून राष्ट्रीय संरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला सल्ला देण्यासाठी 'नॅशनल डिफेन्स कौन्सिल'ची स्थापना करण्यात आली. त्यावर तज्ज्ञ लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी ज. थोरातांची नेमणूक केली. एवढेच नव्हे त्यांना राष्ट्रपतींचे ए.डी.सी. म्हणून सन्मानही बहाल केला. जनरलसाहेब शेवटी म्हणतात, "अशा रीतीने माझा सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला!"
ही सर्व कथा सांगताना जनरलसाहेब व्यथित झाल्याचे दिसत असले तरी त्यांनी कृष्ण मेनन अथवा ज. कौल यांच्याविषयी मोठ्या संयमाने व 'जंटलमन' भाषेत लिहिले आहे. कारण सॅन्डहर्स्टने त्यांना शिकविले होते की लष्करातील अधिकारी मुळात 'जंटलमन' आणि 'सत्यप्रिय' असला पाहिजे. चिनी आक्रमणानंतर अनेक नाट्यमय घटना घडल्या. संरक्षणमंत्री कृष्णा मेनन यांना आपल्या पदावरून जावे लागले. पण जाण्यापूर्वी त्यांनी पं. नेहरूंना असा सल्ला दिला की, जर थापर यांना काढून टाकावे लागले तर त्यांच्या जागी सरसेनापती म्हणून थोरात हे एक आदर्श पर्याय असतील ! ही कथा लष्करात सेवा बजावलेल्या शिव कुणाल वर्मा या लष्करी इतिहासकाराने आपल्या The war that wasn't या ग्रंथात दिली आहे.
अशीच एक आठवण भारतीय लष्करातील एक उच्च अधिकारी मे. ज. पलित यांनी आपल्या War in High Himalaya: The Indian Army in crisis, 1962 या ग्रंथात सांगितली आहे. चिनी आक्रमणाच्या काळात पलित जनरल थापर यांच्याबरोबर विमानातून प्रवास करीत असता त्यांना जनरलनी विचारले की, "माझ्या जागी पर्याय म्हणून थोरातांचे नाव मी सुचवू इच्छितो." त्यावर पलित म्हणाले की, "थोरात साहेबांची जी स्वभावप्रकृती मी जाणतो, त्यावरून निश्चितच वाटते की ते हा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत; कारण त्यामुळे भारतीय लष्करात एक वाईट पायंडा पडेल व ते त्यांस रुचणार नाही!" कृष्ण मेनन व जनरल थापर हे दोघेही थोरातसाहेबांचे कट्टर विरोधक! त्या दोघांनी त्यांच्या नावाचा भारताचे सरसेनापती म्हणून विचार करावा, हा त्यांचा सर्वांत मोठा गौरव होता!
इतर महत्वाच्या बातम्या
























