लक्ष्मण हाकेंचं बारामतीत आक्रमक भाषण; म्हणाले, मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हणलं तर त्याचं कानफाड फोडा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे देखील आक्रमक झाले आहेत. आज त्यानी बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.
Laxman Hake on Sharad Pawar : सरकारने मनोज जरांगे पाटील ( Manoj jarange patil) यांच्यासह राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी (OBC) समाज नाराज झाला आहे. तसेच यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे देखील आक्रमक झाले आहेत. आज त्यानी बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना उभं केलं आहे. शरद पवार यांनी मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवल्याची टीका हाकेंनी केली.
दरम्यान, ज्यावेळी लक्ष्मण हाके यांचे भाषण सुरु होते, त्यावेळी त्यांना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी फोनवरुन उपस्थित जनतेशी संवाद साधला. जबरदस्ती दिलेलं आरक्षण आहे, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल असे आंबेडकर म्हणाले.
मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हणलं तर त्याचं कानफाड फोडा
लक्ष्मण हाके यांनी बारामतीत आज शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार मतं आमची घेतात आणि जरांगेंना पाठिंबा देतात असेही हाके म्हणाले. मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला अस जर कोणी म्हटलं तर त्याचं कानफाड फोडा अशी टीका देखील हाके यांनी केली. देशभरात मंडल आयोग लागू झाला होता, फक्त महाराष्ट्रातच लागू झाला नव्हता. मंडल आयोगाची चळवळ शेकापचे दि बा पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या माणसांनी मंडल आयोग लागू केल्याचे हाके म्हणाले.
शरद पवार 400 संस्थाचे अध्यक्ष आहेत
कुटुंबाच्या बाहेर कारखाने जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदारकी खासदारकी न जाऊ देणारे, असे म्हणत हाकेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 400 संस्थाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिल असा नियम होता, मात्र त्यामध्ये खाडाखोड केली आणि शरद पवार अध्यक्ष झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार झाल्याचे हाके म्हणाले.
ओबीसीचे आरक्षण पडले तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशी लढत होणार
अजित पवार म्हणाले कॅनलच्या कंम्पाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा. कंम्पाऊंड तुझ्या बापाचं आहे का? असा सवाल करत हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या घामाचे कष्टकऱ्यांचे दिन दलितांचे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात असे हाके म्हणाले. सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा कारखाना असं काम हे करत आहेत. सत्ता कोणाचीही असो मंत्रीमंडळात हे असतातच अशी टीका देखील हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत होती. आता जर ओबीसीचे आरक्षण पडले तर ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशी लढत होणार आहे. पुढच्या निवडणुकीत डुप्लीकेट ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशी लढत होणार असल्याचे हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
शरद पवारांचा मानसपुत्र काल रात्री जरांगेंच्या गोधडीत शिरला; मराठा आंदोलनावरुन लक्ष्मण हाकेंचा संताप
























