Laxman Hake : पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर तुम्ही राजकारण विसरा; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा
Laxman Hake Vs Manoj Jarange : भुजबळ, मुंडे बहीण-भाऊ, वडेट्टीवार, जानकर हे ओबीसींच्या 492 जातींचा विचार करतात, मनोज जरांगे फक्त मराठा समाजाचा विचार करतात, मग जातीयवादी कोण असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
जालना: मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, पण ते एवढं सोपं आहे का असा सवाल विचारत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. मराठवाड्यातील ओबीसी एकत्र येतोय, आता पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी एकत्र आला तर मनोज जरांगे यांनी राजकारण विसरावं असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे वडीगोद्री या गावात उपोषणाला बसले आहेत. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
मराठे आज एक नाहीत, संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा त्या पासून एकत्र आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा होणार असे सांगितले होते. हे कळण्याएवढी जरांगे यांची उंची नाही. जरांगे आणि त्यांचे सल्लागार कायम शरद पवार यांचा विरोध करत आलेत. जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुंमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. याला पहिला शिक्षण द्या.
जरांगे म्हणाले की ओबीसींनी मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण गेल्या 70 वर्षांपासून खाल्लं. पण 70 वर्षे खाण्याचा प्रश्न येतोच कुठे? मंडल आयोग 1993 साली लागू झाला. ओबीसी ने रिझर्वेशन खाल्ल असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते. आज राज्यात 250 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 90 टक्के कारखाने हे मराठा समाजाचे आहेत.
भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा?
भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील ,मुंडे बहीण बंधू असतील, वडेट्टीवार साहेब असतील ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती-उप जातीसह 492 जातींची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय. मग नक्की जातीयवादी कोण?
गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेते बदनाम केले.
मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला बरोबर घेतलं म्हणून या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे.
ओबीसींनी कधी कायदा हातात घेतलेला नाही. इथे अठरापगड जातीची माणसे येत आहेत. मंडल आयोग चॅलेंज करायला महाराष्ट्र सोडून दे.नॉर्थ आणि साऊथ सुद्धा आहे, एवढं सोपं आहे.
तुम्हाला मुसलमानांची मते चालली मात्र तुम्हाला जलील चालले नाहीत. तुम्हाला दलितांची मते चालली मात्र तुम्हाला आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत. आपण सर्व दलित, मुस्लिम, एसटी, ओबीसी एकत्रित येऊयात. आपला कोण, परका कोण याचा नक्कीच विचार करूया.
तुम्ही कायम सत्तेत राहिला, तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं, मात्र आमच्या ओबीसींची भावना आणि वेदना इथल्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही. आम्ही आमची भूमिका मांडतो आम्ही कधी ते निर्माण करत नाही. आम्ही ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र मध्ये मराठवाड्याच्या बरोबरीने ओबीसी समाज आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी जागा झाला तर तुम्ही राजकारण नावाची गोष्ट विसरून जा.
ही बातमी वाचा: