Kishor Patil : बोलताना कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी, सत्तारांना घरचा आहेर
Jalgaon News Update : शिंदे गटाचे आमदार आमदार किशोर पाटील यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर दिलाय. प्रत्येक नेत्यांनी बोलताना कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
जळगाव : प्रत्येक नेत्यांनी बोलताना कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे मत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील ( Kishor Patil ) यांनी व्यक्त केलं आहे. आमदार किशोर पाटील यांचं हे वक्तव्य शिंदे सरकार मधील वाचाळवीर आमदारांना घरचा आहेर मानलं जात आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटातील आमदारांना घरचा आहेर दिलाय. "आपली एक राजकीय संस्कृती असून प्रत्येकाने कोणत्याही व्यक्तीवर बोलताना त्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन किशोर पाटील यांनी केलंय.
अब्दुल सत्तार यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभर त्यांच्याविरदात आंदोलने केली जात आहेत. सत्तार यांच्या औरंगाबादमधील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे किशोर पाटील हे भाऊ आहेत. शिवसेनेतील बंडानंतर किशोर पाटील हे शिंदे गटात गेले तर वैशाली या ठाकरे गटातच आहेत. पाटील शिंदे गटात गेल्यानंतर भाऊ किशोर पाटील यांना माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका असा इशारा वैशाली यांनी दिला होता. यावरूनही आमदार किशोर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"वैशाली सूर्यवंशी ही माझी बहीण आहे. ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असून तिने मला कितीही लाथा घातल्या तरी मी तिला सोडणार नाही. आर.ओ. पाटील हे माझे काका होते. त्यांनीच खऱ्या अर्थाने मला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं आहे. कोणीही मला सांगेल की तात्यांचा फोटो लावू नका, मात्र मी फोटो लावल्याशिवाय राहणार नाही. तात्यांच्या विचारामुळेच मी दोनवेळा आमदार झालो असून याच विचारामुळे आता तिसऱ्यांदा देखील आमदार होईन, असा टोलाही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी वैशाली सूर्यवंशी यांना लगावला.
किशोर पाटील यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. जे आमदार शिल्लक आहेत, त्या आमदारांना काहीतरी खुशखबर द्यावी म्हणून सरकार कोसळणार असे आदित्य ठाकरे म्हणत आहेत, असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या