वाडा-भिवंडी महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण; वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास
वाडा-भिवंडी-चावींद्रा ते वडपा रस्त्यावर सध्या खड्डयांचे साम्राज्यच पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पालघर : जिल्ह्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरावस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाडा- भिवंडी - चावींद्रा वडपे बायपास राज्यमार्ग नाशिक-मुंबई महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र पावसामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भिवंडी - चावींद्रा ते वडपा रस्त्यावर सध्या खड्डयांचे साम्राज्यच पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणाला खड्ड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला होता. मात्र शासकीय यंत्रणा या खड्ड्यांकडे आणि रस्त्याच्या दुरावस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र तेही अपूर्णच राहील, काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी निष्कृष्ट दर्जाचा माल वापरण्यात आला तर काही ठिकाणी काम झालंच नाही, त्यामुळे या रस्त्यावर वर्षाचे बाराही महिने कायम खड्डे पाहायला मिळतात. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचं पूर्ण काम झालंच नाहीये असा आरोप स्थानिक करीत आहेत.
पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये सध्या पाणी भरलं आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांची खोली समजत नसून रस्त्यावरून जात असताना त्यांची दुचाकी किंवा चारचाकी या खड्ड्यांमध्ये जोरजोरात आदळते. त्यामध्ये काही वाहन चालक जखमी पण होतात, तर काहींच्या वाहनांचे नुकसान देखील होत आहे. त्यामुळे वाहनांचा मेंटेनेस देखील वाढतोय शिवाय वाहनचालकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे. सध्या या खड्ड्यांमुळे नागरिकांना मान आणि पाठीच्या आजारांचा देखील सामना करावा लागत आहे. तर या खड्ड्यांचा सामना रुग्णांनाही करावा लागत आहे.
रस्त्यावर पडलेल्या या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवरून जाताना दुचाकी आणि इतर वाहनांचा अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे. त्यामुळे या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी आणि या रस्त्याच्या दुरुस्तीचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आणि पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु रस्त्यांसंदर्भात स्थानिकांचा कोणताही निवारण झालेलं नसून प्रशासन जाणून-बुजून या सर्व प्रश्नांकडे तसेच रस्त्यांवरील खड्ड्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील स्थानिक करत आहेत. जर या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? असा सवाल येथील स्थानिक प्रशासनाला करत आहेत.