(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही : अजित पवार
कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजय स्तंभाला आज अभिवादन केलं.
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजूर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. या स्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असं अजित पवार म्हणाले.
कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने जो निधी कबूल केला होता तो अजुनही आलेला नाही. मात्र आता हे एकमेकांवर ढकलण्याऐवजी कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटाला सामोरं जायला पाहिजे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो हीच सदिच्छा. मागील एक वर्षात महाविकास आघाडीने संकटातून मार्ग काढला आहे. नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की कोरोना काळात जे नऊ महिने वाया गेले ते भरुन काढायचे आहेत.