Satej Patil : शाहू महाराजांचा हस्तक्षेप अन् शेवटच्या क्षणी मधुरिमाराजेंची माघार; कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील तोंडघशी पडले?
Madhurima Raje Chhatrapati : आधी राजेश लाटकरांच्या नावाची घोषणा, मग मधुरिमाराजेंना उमेदवारी, आता मधुरिमाराजेंची माघार... यामुळे कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवारच नसल्याचं चित्र आहे.
कोल्हापूर: उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात एक मोठं राजकीय महानाट्य घडलं. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातल्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजेंनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला? मधुरिमाराजेंचा असा कोणता नाईलाज झाला? मधुरिमाराजेंच्या भूमिकेमुळं सतेज पाटील तोंडघशी पडले का? राजकीय शोलेमध्ये पाहुयात कोल्हापुरातल्या या घटनेचा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट
लालबुंद झालेले डोळे आणि चेहऱ्यावरचा लपवता येत नसलेला संताप... काँग्रेस नेते सतेज पाटलांचं हे रुप कोल्हापूरकरांनी पहिल्यांदाच अनुभवलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजेंनी अचानक माघार घेतली आणि तीही शेवटचे काही मिनिट बाकी असताना.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मधुरिमाराजे, मालोराजीराजे आणि शाहू महाराज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. पाठोपाठ सतेज पाटीलही जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सतेज पाटलांनी मधुरिमाराजेंना उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचं आवाहन केलं. पण मधुरिमाराजेंनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात थेट अर्ज मागे घेतला. त्यामुळं सतेज पाटील हे शाहू महाराज, मालोजीराजे आणि मधुरिमाराजेंवर चांगलेच संतापले.
अर्ज मागे घेऊन मधुरिमाराजे जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडल्या. पाठोपाठ सतेज पाटीलही आले. संतापलेल्या सतेज पाटलांनी पुन्हा एकदा शाहू महाराज, मालोजीराजे आणि मधुरिमाराजेंना चांगलंच सुनावलं.
मधुरिमाराजे लढाव्यात ही सतेज पाटलांची इच्छा
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजेंनी लढावं यासाठी सतेज पाटलांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच विनंती केली होती. पण त्यावेळी ही ऑफर शाहू महाराजांनी नम्रपणे नाकारली होती.
एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नको अशी शाहू महाराजांची भूमिका होती. त्यानंतर सतेज पाटलांनी राजेश लाटकर यांच्या नावाची पक्षाकडे शिफारस केली.
राजेश लाटकरांचे नाव मागे घेतलं
काँग्रेसच्या दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या यादीत राजेश लाटकर यांचं नावही आलं. त्यानंतर मधुरिमाराजे आणि मालोजीराजेंनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. काही नगरसेवकांनीही राजेश लाटकरांची उमेदवारी बदलावी यासाठी सतेज पाटलांना पत्र लिहिलं.
सतेज पाटलांनी पुन्हा एकदा पक्षाकडे उमेदवार बदलण्याची शिफारस केली. पक्षानंही राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमाराजेंना तिकीट जाहीर केलं. त्यानंतर नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मधुरिमाराजेंचा अर्ज मागे
राजेश लाटकर यांची समजूत काढण्यासाठी खुद्द शाहू महाराज त्यांच्या घरीही गेले होते. पण राजेश लाटकर निवडणूक लढण्यावर ठाम होते. अखेर शेवटच्या दिवशी मधुरिमाराजेंनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा पंजा गायब
सतेज पाटलांच्या शिफारशीनुसारच काँग्रेसनं राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर सतेज पाटलांच्या शिफारशीनुसारच लाटकरांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजेंना तिकीट देण्यात आलं. त्याच मधुरिमाराजेंनी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. त्यामुळं कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आता काँग्रेसचा पंजा हे चिन्हही गायब झालंय.
मधुरिमाराजेंच्या माघारीमुळं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपुढे आपल्याला तोंडघशी पाडलं गेलं अशी भावना सतेज पाटलांची झाली. काँग्रेसनं आता अपक्ष उमेदवार असलेल्या राजेश लाटकर यांना पाठिंबा दिला. ज्या लाटकरांचं तिकिट काँग्रेसनं रद्द केलं, त्याच लाटकरांना समर्थन देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.
मधुरिमाराजेंचा कोणता नाईलाज होता?
मधुरिमाराजेंनी नाईलाजानं माघार घेतल्याचं शाहू महाराजांनी सांगितलं. पण मधुरिमाराजेंचा नेमका कोणता नाईलाज होता? राजेश लाटकरांची बंडखोरी, मतदारांचा संभाव्य कौल की दुसरंच काही कारण? या प्रश्नाचं योग्य उत्तर फक्त मधुरिमाराजे, मालोजीराजे आणि शाहू महाराजच देऊ शकतील.
ही बातमी वाचा: