कोल्हापुरात यंदा थर्टी फस्ट यंदा घरीच! दाजीपूर अभयारण्य तीन दिवस बंद, महत्वाच्या धरणांवरही नो एन्ट्री
31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी शहरी तरुणाई ग्रामीण भागाकडे वळण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यामध्ये तीन दिवस प्रवेश बंदी ठेवण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी शहरी तरुणाई ग्रामीण भागाकडे वळण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यामध्ये तीन दिवस प्रवेश बंदी ठेवण्यात आली आहे.
30 डिसेंबर ते 1 जानेवारी अशी तीन दिवस दाजीपूर अभयारण्यात बंदी असणार आहे. तर याच तालुक्यातील राधानगरी, काळामवाडी आणि तुळशी धरणावर पाच दिवस दिवस प्रवेश बंद केला आहे. डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी टाळण्यासाठी वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
वन विभागाने घालून दिलेल्या या नियमांचे पालन न केल्यास पोलिस कारवाई केली जाणार आहे. त्याच बरोबर राधानगरी तालुक्यात ठिकठिकाणी तपासणी चौक्या उभा केल्या आहेत. कोल्हापूर-गोवा राज्य मार्ग त्याचबरोबर गैबीपासून दाजीपूर अभयारण्यापर्यंत तपासणी नाके उभा केले आहेत.
राधानगरी हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला तालुका आहे. याठिकाणी जगभरातून पर्यटन येत असतात. मात्र 31 डिसेंबरच्या निमित्ताने काही हुल्लडबाज देखील येतात. या सगळ्याचा नैसर्गिक संपत्तीवर परिणाम होऊ नये आणि पर्यटकांमध्ये चुकीचा प्रचार होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जातेय. त्यामुळे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी राधानगरी तालुक्यात गेलात तर तुमच्यावर कडक कारवाई होणार हे निश्चित आहे.