(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur By Poll Election Result : भाजप की महाविकास आघाडी? 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल
Kolhapur North Assembly Bypoll Election Result : कोल्हापूर पोटनिवडणुकाीचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी ही जागा राखणार का की भाजप पंढरपूर प्रमाणे ही जागा खेचून आणणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Kolhapur North Assembly Bypoll Election Result : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडी ही जागा राखणार, हे आज स्पष्ट होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने जोर लावला होता. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. सतेज पाटील यांचा प्रभाव असलेल्या भागात पोटनिवडणूक होत असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपने ही निवडणूक 'हिंदूत्वा'च्या मुद्यावर केली असल्याचे चित्र आहे. हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने शिवसेनेचा मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडीतील सत्तासुत्रानुसार, शिवसेनेने ही जागा काँग्रेससाठी सोडली. त्यामुळे दोन वेळेसचे आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यांनासोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांना प्रयत्न करावे लागले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगवर संवाद साधला होता. त्यामुळे आता शिवसेनेचे मतदार कोणाला मतदान करणार, यावरही या निकालाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
एक्झिट पोलचा अंदाज काय?
द स्ट्रेलेमा, पुणे या संस्थेने केलेल्या 'मतदानोत्तर सर्वेक्षणातून' कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस 9% मताधिक्याने राखेल असा अंदाज वर्तवलेला आहे. काँग्रेसला 52 टक्के आणि भाजपला 43 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: