Kolhapur By Election Exit Poll : 'काँग्रेस'च 'कोल्हापूर उत्तर' राखण्याची शक्यता, 'द स्ट्रेलेमा'चा अंदाज
Kolhapur By Election Exit Poll News : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत 'द स्ट्रेलेमा'चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा काँग्रेसच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Kolhapur By Election Exit Poll News : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे लागलेली कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक अनेक कारणांनी गाजली. महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाचा 'द स्ट्रेलेमा'चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा काँग्रेसच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेवेळेस ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला मिळाली. काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली.
मागील काही निवडणुकांमध्ये कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला होता. पर्यायाने 'महाविकास आघाडी' म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना आघाडीतील शिवसेनेचं मतदान हे काँग्रेसला मिळेल का? हा या निवडणुकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा होता. भाजपने ही निवडणुक 'हिंदुत्वाच्या' नॅरेटिव्हवर खेचून शिवसेनेच्या मतदारांना, आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेचे मतदार हे आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसला मिळेल यासाठी दोन वेळेस आमदार राहिलेल्या राजेश क्षीरसागर यांना सोबत घेत शिवेसनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही मतदारसंघात पूर्णवेळ तळ ठोकून बसलेले होते. सोबतच उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सने 'शिवसेना कार्यकर्त्यांशी' साधलेला संवाद, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरातील भव्य सभा आणि सोबतच दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून आलेले मंत्री-नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते यातून ही निवडणूक 'काँग्रेस विरुद्ध भाजप' अशी टोकाची बायपोलर आणि बहुचर्चित झालेली दिसून आली.
द स्ट्रेलेमा : एक्झिट पोल :
द स्ट्रेलेमा, पुणे या संस्थेने केलेल्या 'मतदानोत्तर सर्वेक्षणातून' कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस 9% मताधिक्याने राखेल असा अंदाज वर्तवलेला आहे.
एकूण मतदान : 291798
मतदानाची टक्केवारी : 60.09 %
एकूण झालेले मतदान : 175341
द स्ट्रेलेमाच्या सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची विभागणी :
काँग्रेस : 52%
भाजप : 43%
इतर : 5%
द स्ट्रेलेमाच्या सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय झालेल्या मतदानाची विभागणी :
काँग्रेस : 91923
भाजप : 74651
इतर : 8767
काँग्रेसचे विजयी मताधिक्य : 17272
(टीप- सदर बातमी द स्ट्रेलेमाच्या अंदाजावर आधारीत आहे. हे अंदाज एबीपी माझाचे नाही. आम्ही केवळ ते प्रकाशित करत आहोत.)