Kirit Somaiya on Ajit Pawar : किरीट सोमय्यांचं शरद पवारांना चॅलेंज; म्हणाले...
Kirit Somaiya on Ajit Pawar : किरीट सोमय्या यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडसत्राबाबत बोलताना किरीच सोमय्या यांनी हे आव्हान दिलं आहे.
Kirit Somaiya on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत. तसेच या सर्व प्रकरणाबाबतचे पुरावे मी ईडीकडे (ED) सुपूर्द करेन, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांची शहरात सकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी सांगोला येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु होतं. याबाबत बोलताना शरद पवारांनी सरकारी यंत्रणांचा खरपूस समाचार घेतला होता. याबाबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकारचं रिमोट कंट्रोल असणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांच्या घरावरील आयकर विभागाच्या धाडींसंदर्भात वक्तव्य केलं. पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणचं आहे? त्यांनी अजित पवार यांना 100 कोटी किती वर्षांपूर्वी दिले होते?"
"अजित पवार यांनी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्यावर सांगितलं की, बहीणींच्या घरी धाडी का टाकल्या? त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण माझ्याकडे पुरावे आहेत की, जरंडेश्वर साखर कारखान्यांपासून ते अजित पवारांच्या 70 बेनामी आणि नामी संपत्तीत, त्या कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी आणि भावजींची भागीदारी आहे. अजित पवार तुम्ही राज्याशी बेईमानी केली. मग ती जनतेची केली की, बहिणीची केली. बहिणीच्या नावानं भागीदारी आणि संपत्ती आहे, आपण म्हणताय त्यांचा काही संबंध नाही. हे शरद पवारांना मान्य आहे का?", असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "माझं शरद पवारांना चॅलेंज आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे मी उद्या ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयालाही पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं चौकशीचे आदेशही दिले आहेत. यातील एकही कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार, सुप्रीया सुळे यांनी सिद्ध करुन दाखवावं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :