(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळी मंगळवेढ्यात खिलार खोंडाला मिळाले तब्बल 6 लाख 11 हजार रुपये, डिझेल दरवाढीनंतर पशुधनाला मागणी
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या भागात खिलारची पैदास मोठा प्रमाणात असल्याने येथे खिलार खोंडांचे संगोपन करून त्याच्या विक्रीचा जोडधंदा शेतकऱ्यांच्या संसाराला चांगलाच आधार देऊ लागला आहे.
पंढरपूर : शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरु असताना रोज डिझेलचे दर वाढू लागल्याने आता शेतकरी पुन्हा पशुधनाकडे वाळू लागला असून मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील शेतकऱ्याच्या खिलार खोंडाला तब्बल 6 लाख अकरा हजार रुपयाची किंमत मिळाली आहे. मंगळवेढा हा तास दुष्काळी पट्टा, पावसावर येणाऱ्या ज्वारी पिकाचा त्याला काय तो आधार यामुळेच अलीकडच्या काळात या भागातील शेतकरी खिलार जनावरांच्या संगोपनाकडे वळू लागला . पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा या भागात खिलारची पैदास मोठा प्रमाणात असल्याने येथे खिलार खोंडांचे संगोपन करून त्याच्या विक्रीचा जोडधंदा शेतकऱ्यांच्या संसाराला चांगलाच आधार देऊ लागला आहे.
खिलार जनावरे हे शेतीकामाला अतिशय काटक, ताकदवान जनावरे म्हणून ओळखले जाते. पायाची चांगली उंची, समोर येणारी आकर्षक शिंगे आणि मजबूत वशिंड असे देखणे रूप असलेल्या खिलार खोंडामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असल्याने शेतीकामाचा वाघ असे या खिलार खोंडाना मानले जाते. मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील शेतकरी सतीश होनराव यांनी हे खिलार खोंड दीड वर्षांपूर्वी दोन लाखाला विकत आणले होते. यानंतर त्यांला चांगला खुराक आणि जोपासना केल्यानंतर आज हे देखणे खोंड प्रत्येक बाजारात भाव खाऊन जात होते. या खोंडाला खरेदी करण्यासाठी पुण्यातील सागर टिळेकर यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केल्यावर अखेर 6 लाख 11 हजार रुपयाला याची विक्री झाली. फक्त दीड वर्षाच्या चांगल्या देखभालीमुळे होनराव यांना चार लाखाचा फायदा झाला.
हीच भूमिका ठेऊन या दुष्काळी भागातील शेतकरी आता खिलार खोंडांची जोपासना करून त्याची विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत . एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला कायमची दुष्काळी परिस्थिती अशामध्ये हा खिलार खोंडाचा व्यवसाय गोरगरीब शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार बनत आहे.
संबंधित बातम्या :
तब्बल दीड लाखाची शेळी! नेवासातील एका शेतकऱ्याच्या आफ्रिकन शेळीची चर्चा
आटपाडीतील चोरीला गेलेला 16 लाख रुपये किंमतीचा बकरा सापडला, तीन आरोपी अटक
आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!