Karad News : ऊसाच्या फडात आढळली बिबट्याची तीन बछडे
Karad Latest News : बछड्यांना पाहताच बिबट्या आसपास असावा, या भीतीने मजुरांनी तेथून पळ काढला.

Karad Latest News : कराडमध्ये ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची तीन बछडी आढळली आहेत. ऊसतोडी सुरु असताना बिबट्याची तीन बछडी निदर्शनास आली. कराडमधील पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात बछडी आढळली. सोमवारी दुपारी ऊसतोडणी सुरु असताना शिवारात बिबट्याची तीन बछडी आढळली. बछड्यांना पाहताच बिबट्या आसपास असावा, या भीतीने मजुरांनी तेथून पळ काढला. शंकर तुकाराम ढेरे यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील सतीश भिसे यांचीशी संपर्क करत याबाबतची कल्पना दिली.
पोलीस पाटील सतीश भिसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कल्पना दिली. वनविभागाचे पथक तात्काळ पांढरीची वाडी येथील धरे शिवारात दाखल झाले. वनविभागाने बिबट्याच्या बछड्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. या बछड्याचे फोटो आणि व्हिडीओ कराड भागात व्हायरल झाले आहेत.
पांढरीची वाडी येथील धरे शिवारात जिथे बछडे आढळून आली, तिथेच मादी बिबट्याही जवळपासच होती. मादी बिबट्या चिडून आक्रमक होऊ नये, म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन बछड्यांचे आईसोबत मिलन घडवून आणायचे ठरले. त्याप्रमाणे सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन पिल्ले एका क्रेटमध्ये ठेवली. तसेच आजूबाजूला कॅमेरेही लावण्यात आले. कॅमेरा लावत असताना बिबट्याची मादीने दर्शन दिले. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी मादी बिबट्या आजूबाजूलाच घुटमळत होती. त्यामुळे बछड्यांना क्रेटमध्ये ठेवून कॅमेरा लावून अधिकारी जागेवरून निघाले. अखेर आई आणि बछड्यांचे मिलन झाले. मादी बिबट्या थोड्यावेळानंतर आपल्या बछड्यांनासोबत घेऊन गेली. मादीसह बछडी शिवारात सुरक्षितरीत्या दृष्टीआड झाल्यानंतर वनाधिकारी तेथून रवाना झाले.
सदर कारवाहीसाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
























