(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तुम्ही जनतेचे सेवक, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही'; कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना कंगनाने पीओकेशी केली होती. याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला होता. अशातच आता कंगनाने ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागण्याची असल्याची टीकाही कंगना रनौतनं केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत विरुद्ध शिवसेना हा वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना कंगनानं पीओकेशी केली होती. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्षरित्या कंगनाला खडे बोल सुनावले होते. त्यावरून कंगनाने ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, ठाकरे कुटुंबिय, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी कंगनाच्या एका ट्वीटचाही उल्लेख केला ज्यामध्ये कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोणीतरी म्हणालं होतं की, मुंबई पीओके प्रमाणे आहे. ही लोकं मुंबईत काम करण्यासाठी येतात आणि पुन्हा शहराचं नाव खराब करतात.'
पाहा व्हिडीओ : तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही; कंगनाची पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, काही लोक मुंबईला ड्रग्ज हब म्हणत बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी कोणत्याही नावाचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'लोकांना हे माहिती नाही की, गांज्याची शेती कुठे केली जाते.' यावरही पलटवार करत कंगनाने ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
कंगनाचे ट्वीट :
Just how beauty of Himalayas belongs to every Indian, opportunities that Mumbai offers too belongs to each one of us, both are my homes, Uddhav Thackeray don’t you dare to snatch our democratic rights and divide us, your filthy speeches are a vulgar display of your incompetence..
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, 'जशी हिमालयाचं सौंदर्य संपूर्ण भारतीयाचं आहे, ठिक त्याचप्रमाणे मुंबई ज्या संधी देते त्या आम्हा सर्वांशी संबंधित आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडून आमचे लोकशाही अधिकार काढून घेण्याचा आणि आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची घाणेरडी भाषणं तुमच्या नाकर्तेपणाचं अश्लील प्रदर्शन करतात.'
कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली की, 'तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री. जनतेचे सेवक असूनही तुम्ही याप्रकारच्या क्षुल्लक भांडणांमध्ये सामील होत आहात. आपल्या ताकदीचा वापर स्वतःची बेइज्जती, नुकसान आणि लोकांना कमी दाखवण्यासाठी करत आहात, जे तुमच्या मताशी सहमत नाहीत. तुम्हाला ती खुर्ची शोभा देत नाही, ज्यावर तुम्ही बसून घाणेरडं राजकारण करत आहात.'
कंगना ट्वीट करत म्हणाली की, 'तुमच्यासारखे नेते ज्यांना या (हिमाचल प्रदेश) राज्यासंदर्भात सूड घेणारी, लहान आणि आजारी वृत्ती असणारी माहिती आहे. हे राज्य भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचं निवास स्थान आहे. जिथे मार्कंड्य, मनु ऋषी आणि पांडव यांसारख्या महान ऋषींनी वनवासात बराच वेळ घालवला.'
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :