बिहारमध्ये मोफत लस मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाईन दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांशी संवाद साधला.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा बऱ्याच दिवसांचा हिशोब चुकता केलला पाहायला मिळाला. बिहारमध्ये निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मुख्यमंत्री झाल्यावर पहिला दसरा मेळावा : ठाकरे
आज मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला दसरामेळावा आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुफान महासागर लोटला असता. मला खात्री आहे तो तुफान महासागर, त्या लाटा इथपर्यंत आल्या नसल्या तरी तो महाराष्ट्रामध्ये उचंबळून, उसळून हा सोहळा बघतोय, अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली.
Shivsena Dussehra Melava : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान
पुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा! असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुडी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
बिहारमध्ये मोफत लस मग इतर ठिकाणी विकत का?
बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. बिहारमध्ये मोफत लस देणार आणि इतर ठिकाणी विकत का? असा सवाल करत भाजपला लक्ष्य केलं.